रेल्वे स्थानक आणि खासकरून मुंबई लोकल स्थानकांवर काळ्या कोटात फिरणारे टीसी म्हणजेच तिकीट तपासनीस तुम्ही नियमितपणे पाहिले असतील. ते प्रवाशांकडे तिकीट तपासतात हे आपल्याला माहीत आहे. पण, विनातिकीट प्रवास हा एकच गुन्हा नाहीए. रेल्वेतून प्रवास करताना किंवा रेल्वेच्या हद्दीत असताना इतरही अनेक गुन्ह्यांसाठी तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा तुमची चौकशी होऊ शकते. तिकीट तपासनीसांबरोबरच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्यासाठी तुमचयावर कारवाई करू शकतात. तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात. असे कोणते गुन्हे आहेत आणि त्यासाठी शिक्षा काय आहे बघूया.
सर्वसाधारणपणे विनातिकीट प्रवास केल्यावरच आपल्याला शिक्षा होते. दंड आकारला जातो यांची कल्पना आहे. काहिंना तर प्रत्यक्ष अनुभव ही असेल. पण रेल्वे प्रवासा संदर्भात रेल्वे मंत्रालयाने 12 नियम तयार केले आहेत. या नियमांचे जर आपण उल्लंघन केलं तर आपल्याला रेल्वे अॅक्ट अंतर्गत शिक्षा होऊ शकते. जाणुन घेऊयात हे कायदे कोणते आहेत आणि शिक्षा काय असते.
Table of contents [Show]
- विनातिकीट प्रवास करणे
- योग्य त्या तिकीट किंवा पासाशिवाय प्रवास करणे
- अलार्म चेन पूल करणे
- अनधिकृतरीत्या तिकीट काढने व वाढीव दराने विकणे
- अनधिकृत फेरीवाले
- कचरा फेकणे
- रेल्वे रूळ ओलांडणे
- अपंग बांधवासाठी राखिव असलेल्या डब्यातून प्रवास करणे
- रेल्वेच्या टपावरून प्रवास करणे
- महिला डब्यातून प्रवास करणे
- स्फोटकशील पदार्थ बाळगल्यास
विनातिकीट प्रवास करणे
जर तुम्ही रेल्वे तिकीट खरेदी न करता प्रवास करत असाल तर रेल्वे अॅक्ट 137 नुसार तुम्हाला 6 महिन्याचा तुरुंगवास किंवा 1 हजार रूपयाचा दंड भरावा लागतो. काही वेळेस दोन्ही शिक्षा केल्या जातात.
योग्य त्या तिकीट किंवा पासाशिवाय प्रवास करणे
रेल्वे प्रवास करताना तुम्हाला योग्य त्या स्थानकांचे तिकीट किंवा पास काढणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य तिकीटा शिवाय प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वे अॅक्ट 138 नुसार दंड भरावा लागतो. ही दंडाची रक्कम तुम्ही प्रवास सुरू केलेल्या स्थानकापासून ते तुम्हाला ज्या स्थानकावर उतरायचे आहे त्या स्थानकापर्यंतचे तिकीट दर आणि 250 रूपये अधिकतर दरासह दंड आकारला जातो.
अलार्म चेन पूल करणे
रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अलार्म चैन लावलेल्या असतात. ही अलार्म चैन जर तुम्ही कोणतेही कारण नसताना ओढली तर तुम्हाला रेल्वे अॅक्ट 141 नुसार तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 हजार दंडाच्या शिक्षेची तरतुद आहे.
अनधिकृतरीत्या तिकीट काढने व वाढीव दराने विकणे
अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर तिकीट काढुन देणारे एजंट असतात. या एजंटकडे या व्यवसायाची परवानगी असते. मात्र, काही ठिकाणी वैयक्तिक आयडीवर प्रवाशांना तिकीट काढुन देऊन त्याचा वाढीव दर आकारतात. असे प्रकार टाळावेत यासाठी रेल्वेने 143 अॅक्ट अंमलात आणला आहे. रेल्वेकडून अलीकडेच मुंबई व पटनामध्ये अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयाचा दंड अशा दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.
अनधिकृत फेरीवाले
रेल्वेप्रवासा दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होतानाचे प्रसंग आपण खूप वेळा पाहिले असतील. रेल्वेमध्ये फेरीवाल्यांना बंदी असते. मात्र, तरिही सर्रासपणे फेरीवाल्यांचा व्यवसाय हा सुरूच असतो. पण जर कधि पोलिसांनी कारवाई केली तर या फेरिवाल्यांवर रेल्वे अॅक्ट 144 अंतर्गत शिक्षा होते. यामध्ये एक वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 ते 2 हजार रूपयापर्यंतचा दंड आकारला जातो. ाही वेळी दोन्ही स्वरूपाची शिक्षा केली जाते.
कचरा फेकणे
रेल्वेच्या डब्यात कचरा फेकण्यास, रिकाम्या बाटल्या फेकण्यास सक्त मनाई आहे. कळत-नकळत आपल्या हातुनसुद्धा असे कृत्य घडले असणार. पण आता काळजी घ्या. कारण जर तुम्ही कचरा किंवा रिकामी बाटली फेकली तर तुम्हाला रेल्वे अॅक्ट 145 (ब) अंतर्गत 100 ते 250 रूपयापर्यंतचा दंड व एक महिना तुरुंगवास होऊ शकतो.
रेल्वे रूळ ओलांडणे
रेल्वे रूळ ओलांडल्यास तुम्हाला रेल्वे अॅक्ट 147 अंतर्गत सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा 1 हजार रूपयाचा दंड आकारला जातो. जर तुम्हाला वारंवार रेल्वे रूळ ओलांडला पाहिले गेले असेल तर दोन्ही स्वरूपाची शिक्षा होऊ शकते.
अपंग बांधवासाठी राखिव असलेल्या डब्यातून प्रवास करणे
गर्दीच्यावेळी अनेक प्रवासी हे बेकायदेशीररीत्या अपंग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करत असतात. मात्र या विरोधात रेल्वे अॅक्ट 155 (अ) अंतर्गत 3 महिन्याचा तुरुंगवास वा 500 रूपये दंड किंवा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षेची तरतुद केली आहे.
रेल्वेच्या टपावरून प्रवास करणे
आधी रेल्वेच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त होते. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली होती. मात्र, अलीकडे हाय व्हॉटएज पॉवरमुळे अशा प्रकारचा धोकादायक प्रवास बंद झाला आहे. तरी कायद्याची जरब असावी म्हणून रेल्वे अॅक्टच्या 156 नुसार अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्यांना 3 महिन्याचा तुरुंगवास वा 500 रूपये दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा केली जाते.
महिला डब्यातून प्रवास करणे
ज्याप्रमाणे अपंग बांधवांच्या डब्यातुन प्रवास केल्यास शिक्षेस पात्र होतो तसचं महिला राखिव डब्यातुनही पुरूष प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी आहे. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनंतरच महिला राखिव डब्यातून पुरूषांना प्रवास करता येतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशाचे तिकीट वा पास जप्त करून 500 रूपयाचा दंड आकारला जातो.
स्फोटकशील पदार्थ बाळगल्यास
रेल्वे प्रवासा दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणत्याही प्रकारचे स्फोटकशील पदार्थ जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. रेल्वे अॅक्ट 164 अंतर्गत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 हजार रूपयाचा दंड ठोठावला जातो.