Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढला, कशी होतेय कमाई? वाचा...

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढला, कशी होतेय कमाई? वाचा...

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढलाय. सध्या पेटीएमचा जीएमव्ही म्हणजेच सकल व्यापारी मूल्य 2.65 लाख कोटी रुपये झालंय. त्यामुळे कंपनीची वाटचाल नफ्याच्या दिशेनं चाललीय. कारण मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा जीएमव्ही 1.96 लाख कोटी रुपये होता.

फिनटेक फर्म वन 97 कम्यूनिकेशनच्या (One97 Communications) जीएमव्हीमध्ये (Gross merchandise value) एप्रिल-मे 2023 या कालावधीत वार्षिक आधारावर 35 टक्के वाढ झाली. या वाढीसह जीएव्ही आता 2.65 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय. मागच्या वर्षी वर्षी याच कालावधीत तो 1.96 लाख कोटी रुपये होता. पेटीएम ब्रँड वन 97 कम्यूनिकेशन्स कंपनीचा आहे. जीएमव्ही म्हणजेच एकूण व्यापारी मूल्य. पेटीएमचा विचार केल्यास, कंपनीच्या अ‍ॅपचा वापर करून व्यवहार केलेल्या किंवा कर्ज वाटप केलेल्या रकमेची रक्कम जीएमव्हीमध्ये येईल. दरम्यान, हा पेटीएमचा महसूल नाही. कारण कमिशन, शुल्क आणि व्याज इत्यादींमधून कंपनी आपली कमाई करते.

पेमेंट व्हॉल्यूमवर कंपनीचं लक्ष

पेटीएम कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही तिमाहीपासून कंपनीचं लक्ष सतत पेमेंट व्हॉल्यूमवर होतं. कारण याच माध्यमातून कंपनीचा नफा वाढतो. या वर्षी एप्रिल-मे दरम्यान, पेटीएमचा वापर करून त्याच्या भागीदारांद्वारे वितरित केलेल्या कर्जांची संख्या दुप्पट झालीय. मागच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 3,576 कोटी रुपये होता. यावर्षी तो 9,618 कोटी रुपयांवर पोहोचलाय. कंपनीनं ट्विट करून केवळ जीएमव्हीच नाही, तर विविध स्तरावर केलेल्या प्रगतीची सविस्तर माहितीच यात दिलीय.

यूजर्सच्या संख्येत वाढ

कंपनीच्या अ‍ॅपवर प्रत्येक महिन्याला व्यवहार करणाऱ्या यूजर्सच्या संख्येत वाढ होतेय. ती वाढ सुमारे 24 टक्क्यांनी नोंदवण्यात आलीय. एक वर्षापूर्वी एप्रिल-मे दरम्यान हा आकडा 7.4 कोटी होता. तो आता 9.2 कोटी झाला आहे. पेटीएमतर्फे एक पेमेंट डिव्हाइस इन्स्टॉल केलं जातं. त्याची संख्यादेखील आता दुप्पट झालीय. गेल्या वर्षी एप्रिल-मे दरम्यान 34 लाख पेमेंट डिव्हाइस बसवण्यात आली होती, ती यंदा 75 लाखांपर्यंत वाढली आहेत. मागच्या महिन्याशी तुलना केल्यास सुमारे 4 लाख डिव्हाइसची वाढ नोंदवण्यात आलीय.

पेटीएम लीडर

पेमेंट मॉनेटायझेशनमध्ये पेटीएम अजूनही लीडर आहे. सर्व व्यापाऱ्यांना कंपनीतर्फे दिलं जाणार सबस्क्रिप्शन डिव्हाइस म्हणजेच साउंडबॉक्स आणि पीओएस मशीनला मोठ्या प्रमाणात व्यापारी आपल्याकडे मागवून घेत आहेत, असं कंपनीनं म्हटलंय.

स्थापन झाल्यापासून कंपनी कधीही नव्हती फायद्यात

यूपीआय पेमेंट अ‍ॅप असलेलं पेटीएम स्थापन झालं, तेव्हापासून खरं तर कधीच कंपनी फायद्यात नव्हती. सुरुवातीच्या काळात लोक पेमेंट यूपीआयमार्फत कमी करत होते. एटीएमचा अथवा कॅशचाच पर्याय वापरला जात होता. आता मात्र पेमेंट करताना सर्वत्रच यूपीआयला प्राधान्य दिलं जातं. आजच्या परिस्थितीत पेटीएमचं मार्केट पाहिलं तर पेटीएमचा क्यूआर कोड, पीओएस मशीन किंवा इतर डिव्हाइसेस सगळीकडेच इन्स्टॉल केलेली तुम्हाला दिसून येतील.

महसुलात वाढ

महसुलाचा विचार केल्यास, आर्थिक वर्ष 2022मध्ये कंपनीचा महसूल सुमारे 3892 कोटी रुपये होता. 2023मध्ये तो वाढून 6027 कोटी रुपये इतका झाला. कंपनीचा निव्वळ तोटा 2022मध्ये 2325 रुपये होता. 2023मध्ये तो थोडासा कमी होऊन 1855 कोटी रुपयांवर आला. सध्याची आकडेवारी पाहता आता पेटीएम नफ्यात आहे. दरम्यान, मागच्या महिन्यात पेटीएमच्या नफ्यात होत असलेल्या वाढीची बातमीही सर्वत्र पाहायला मिळाली होती. जवळपास 52 टक्क्यांनी पेटीएमचं उत्पन्न वाढल्याचं दिसून आलं.