मुदत ठेवीच्या योजनेमध्ये बचत खात्यातील व्याजापेक्षा जास्त परतावा आणि हमखास मिळतो, म्हणून त्याची लोकप्रियता अजून टिकून आहे. पण बऱ्याच बँका मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण केला नाही तर त्यावर दंड आकारतात. त्यामुळे तुमचे नुकसान होते. पण तुम्हाला जर अशी एखादी मुदत ठेव योजना मिळाली. जिचा मुदत कालावधी पूर्ण केला नाही तरी त्यावर दंड आकारला जात आहे. यासाठी तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडची एफडी सुरू करू शकता.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या मुदत ठेवीची खासियत म्हणजे, याचा कालावधी 365 दिवसांनी पूर्ण होतो. म्हणजे 365 दिवसांत तुमची एफडी मॅच्युअर्ड होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या पेमेंट्स बँक ही ग्राहकांचे थेट पैसे फिक्सड डिपॉझिटमध्ये गुंतवत नाही. पेटीएम बँकेने यासाठी इंड्सइन बँकेसोबत भागीदारी केली आहे आणि त्या माध्य्मातून पेटीएम एफडीची योजना देत आहे.
100 रुपयांत एफडी सुरू करा
पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत तुम्ही अगदी 100 रुपयांत एफडी करू शकता आणि पेटीएम बँक या एफडीवर जवळपास 7.50 टक्के इंटरेस्ट देत आहे. या एफडीची सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे ही एफडी तुम्ही मॅच्युअर्ड होण्यापूर्वी तुम्ही यातून पैसे काढू शकता. फक्त एफडी सुरू केल्यापासून अवघ्या 7 दिवसांत तुम्ही त्यातून बाहेर पडला तर तुम्हाला त्यावर काहीच व्याज मिळणार नाही.
पेटीएम बँक किमान 7 दिवसांपासून त 365 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी मुदत ठेवींची योजना राबवत आहे. किमान 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवींसाठी 3.50 टक्के तर 365 दिवसांकरीता 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक सुरक्षित आहे का?
माझे पैसे सुरक्षित राहतील का? असा प्रश्न कोणालाही आणि कशाच्याही बाबतीत पडू शकतो. त्यानुसार पेटीएम बँकेच्या एफडीमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षित आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर जे इतर बँका आणि वित्तीय कंपन्या देतात, तेच आहे. ते म्हणजे, बँक बुडाल्यास किंवा दिवाळखोरी झाल्यास गुंतवणूकदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून आर्थिक संरक्षण मिळते. जे पूर्वी 1 लाख रुपये होते. ते आता 5 लाख रुपये करण्यात आले आहे. पेटीएम पेमेंट्सच्या एफडीवर इतर बँकांप्रमाणेच हा इन्शुरन्स मिळतो.