Financial Literacy: आपल्याकडील बऱ्याच पालकांना असे वाटते की, मुलांना जे काही शिक्षण द्यायचे आहे, ते शिक्षकांनी शाळेतून द्यावे. ती त्यांची जबाबदारी आहे. मग ते शिक्षण पुस्तकी असो की, व्यवहार ज्ञान असो किंवा एखाद्या सवयीबद्दल असो. पालकांचे असे मत असते की, मुलांना शाळेनेच सर्व गोष्टी शिकवल्या पाहिजेत.
पण अमेरिकेतील वन पोल (OnePoll) या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये याच्या उलट निष्कर्ष आढळून आले आहेत. या सर्व्हेत पालकांनी ही स्वत:ची जबाबदारी मानली आहे आणि मुलांना व्यवहारिक किंवा आर्थिक शिक्षण हे घरातूनच दिले गेले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. या सर्व्हेमध्ये जवळपास 2 हजार पालकांची मते जाणून घेण्यात आली होती. या पालकांची मुले 5 ते 17 या वयोगटातील आहेत. तर या मुलांना शालेय जीवनापासून किंवा लवकरात लवकर आर्थिक शिक्षण दिले गेले पाहिजे का? याबाबत विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते.
सर्व्हेमधील वेगवेगळ्या प्रश्नांसोबतच मुलांना आर्थिक शिक्षण कोणी द्यावे? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी हा प्रश्न का विचारण्यात आला. हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊ. कारण प्रश्नामागचे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व्हेपूर्वी पैशांना धरून मुलांच्या बाबतीत आणखी एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास 38 टक्के मुलांना डॉलरची व्हॅल्यू कळत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्या सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर हा नवीन सर्व्हे करण्यात आला आहे.
समाजाचा कल जाणून घेणार सर्व्हे महत्त्वाचे!
व्यावहारिक ज्ञान किंवा एखाद्या सवयींबद्दलचे सर्व्हे अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये वरचेवर होत असतात. भारतात अशा प्रकारचे सर्व्हे होताना दिसत नाहीत. अजूनही काही संस्था प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, भाषेवरील प्रभुत्व, गणिताचे आकलन असे सर्व्हे करतात. पण मुलांचे व्यावहारिक ज्ञान, त्यांच्या सवयी किंवा समाजातील सध्याचे बदलते ट्रेण्ड याविषयीचे सर्व्हे भारतात करण्याचे धाडस केले जात नाही. असो, पण परदेशातील अशाप्रकारच्या सर्व्हेमधून आपणास बऱ्याच गोष्टींचे अनुमान लावता येऊ शकतात. त्यातील आर्थिक शिक्षण किंवा साक्षरता हा खूपच महत्त्वाचा विषय आहे.
महाराष्ट्र किंवा आपल्याकडील काही जिल्ह्यांचा विचार करता मुलांची शैक्षणिक प्रगती जरी बेताची असली तरी, त्यांचे व्यावहारिक ज्ञान कदाचित योग्य असू शकते. पण त्याला शिक्षकांसोबत पालकांकडून व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळाली तर नक्कीच मुलांमध्ये लहानपणापासून आर्थिक शिक्षणाची गोडी तर वाढेलच. पण त्याचबरोबर त्यांचे या विषयातील ज्ञान अधिकाधिक वृद्धिगंत होत राहील.
पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहार ज्ञानावर भर हवा
आपल्याकडील शिक्षण पद्धतीतील रचनेनुसार विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानापेक्षा पुस्तकी ज्ञान अधिक दिले जाते. ज्याचा उपयोग त्यांना प्रत्यक्ष जीवन जगताना खूपच कमी प्रमाणात होतो. पण पुस्तकी ज्ञानासोबतच मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान दिले तर ते वयोमानानुसार, त्यामध्ये प्रगत होतील आणि त्याचा त्यांना भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. पण ही जबाबदारी शिक्षकांनीच पार पाडली पाहिजे, असे म्हणणे पूर्णत: चुकीचे ठरू शकतो. कारण मुले शाळेतील 5 तास सोडली तर उर्वरित वेळ पालकांसोबतच असतात. त्यामुळे पालकांनीच मुलांना व्यवहार ज्ञान आणि आर्थिक शिक्षणाचे धडे देणे उचित ठरेल.