2000 Notes Deposit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (मंगळवार) नागरिकांना बँकांमधून या नोटा बदलता येतील किंवा बँकेत जमा करता येतील. मात्र, जर एकाच वेळी 50 हजारांपेक्षा म्हणजेच 25 पेक्षा जास्त नोटा जमा (डिपॉझिट) करत असाल तर पॅन कार्ड अनिवार्य असेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
आयकर कायद्यातील 114B नियम काय आहे
आयकर कायद्यातील 114B या नियमानुसार 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत किंवा पोस्टाच्या खात्यात जमा करताना पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, जर एकाच दिवसात 50 हजारांपेक्षा कमी पैसे जमा करत असाल तर पॅन कार्डची गरज नाही. समजा तुम्ही बँकेच्या खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटांद्वारे 30 हजार रुपये जमा केले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच बँक खात्यात 40 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य असणार नाही. मात्र, जर तुम्ही एकाच दिवसात 40+30= 70 हजार रुपये जमा करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड बँकेत जमा करावे लागेल.
एका आर्थिक वर्षात व्यवहार करताना मर्यादा किती
जर एका आर्थिक वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त पैसे खात्यात जमा करत असाल किंवा काढत असाल तर तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. 10 मे 2022 ला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) द्वारे याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते आणि 26 मे पासून हा नियम लागू झाला.
दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याबरोबरच बदलून घेण्याचा पर्यायही नागरिकांकडे आहे. मात्र, नोटा बदली करून घेण्यावर आरबीआयने मर्यादा घातली आहे. एका दिवसात 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपये एक्सजेंच करता येतील. तसेच नोटा बदली करताना बँक त्यांचे स्वत:चे काही नियम लावू शकते, असेही आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 22 मे ला माध्यमांशी बोलताना म्हटले.
बँक खात्यामध्ये पैसा जमा करताना RBI चे केवायसी (KYC) नियमावली लागू राहील. तसेच दोन हजाराच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असेल. क्लिन मनी पॉलिसीअंतर्गत केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला.