कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड देशातील प्रत्येक कर भरणाऱ्या नागरिकाला दिले जाते. हा 10-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन अल्फान्यूमेरिक नंबर आहे. सर्व कर भरणाऱ्या व्यक्ती, व्यवसाय, संस्था आणि स्थानिक सरकार यांच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पॅन कार्ड (PAN Card) दिले जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की अल्पवयीन मुले देखील पॅन कार्ड वापरू शकतात. नियमांनुसार, भारतात ITR भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर अल्पवयीन व्यक्ती दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त कमावत असेल तर तो ITR (Income Tax Return) देखील दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत आयटीआर फाइल करण्यासाठी पॅनकार्ड खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयकर विभागाने पॅन कार्ड काढण्यासाठी कोणतेही विशिष्ट वय निश्चित केलेले नाही.
अल्पवयीन व्यक्तीला पॅन कार्ड कधी लागते?
- जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर गुंतवणूक करता.
- जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या गुंतवणुकीचा नॉमिनी बनवता.
- जेव्हा तुम्हाला मुलाच्या नावाने बँक खाते उघडायचे असेल.
- जेव्हा अल्पवयीन कमावते असतात.
कोण अर्ज करू शकतो?
अल्पवयीन व्यक्तीसाठी पॅनकार्ड बनवण्याचा अर्ज त्याच्या पालकांच्या वतीने किंवा कायदेशीर पालक असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या वतीने केला जातो. मुलाच्या वतीने ITR दाखल करणे ही पालकाची जबाबदारी आहे. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने जारी केलेल्या पॅनकार्डवर त्याचा फोटो आणि स्वाक्षरी नसल्यामुळे ते ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येत नाही. जेव्हा अल्पवयीन 18 वर्षांचा होतो, तेव्हा त्याला/तिला पॅन कार्ड अपडेटसाठी अर्ज करावा लागतो.
पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा?
- NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- फॉर्म 49A भरण्यासाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.
- अल्पवयीन मुलाचे वय प्रमाणपत्र आणि पालकांच्या फोटोसह इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आता फक्त पालकांच्या सह्या अपलोड करा.
- 107 रुपये भरून पुढे जा. आता सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक पोचपावती क्रमांक दिला जाईल जो अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी कोणीही वापरू शकतो.
- यशस्वी पडताळणीनंतर 15 दिवसांच्या आत पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल.