वाहन उद्योगासाठी राष्ट्रीय पातळीवरचा मोठा मेळावा अर्थात ऑटो एक्स्पो येत्या 12 ते 15 जानेवारी 2023 या दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या मेळाव्या नव्या कार्सचे लॉंचिंग, नवे तंत्रज्ञानाचा अविष्कार ग्राहकांना अनुभवता येणार आहे.
ऑटो एक्स्पोचे यंदाचे 16 वे वर्ष आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑटो एक्स्पोचे आयोजन होणार असल्याने वाहन कंपन्यांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. ऑटो एक्स्पोसोबतच वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांची देखील मोठी परिषद याच ठिकाणी होणार आहे. 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो'मध्ये 15 देशांमधील जवळपास 800 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांची शिखर संघटना ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चर्सस असोसिशन ऑफ इंडिया (Automotive Component Manufacturers Association of India-ACMA) या संस्थेने 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो'चे आयोजन केले आहे. यंदाच्या शोची थिम टेक्नोवेशन-फ्युचर टेक्नॉलॉजीस अॅंड इनोव्हेशन अशी आहे. वाहन क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाचे या शोमध्ये सादरीकरण केले जाणार आहे. यात वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या, ईव्ही स्पेअरपार्ट बनवणारे उत्पादक, स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत.
जवळपास 60,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो'चे आयोजन करण्यात आले आहे. यात 15 देशांतील 800 कंपन्या आपले उत्पादने, नव तंत्रज्ञान सादर करतील. फ्रान्स, जर्मनी, जपान, पोलंड, दक्षिण कोरिया, आणि यु.के या देशांची 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो'मध्ये स्वतंत्र दालने आहेत. चीनने यंदा या शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. या शोसाठी एक लाखांहून अधिक ग्राहक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार भेट देण्याची शक्यता आहे.