Farming Idea: आज अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करुन शेती करतात. त्यातही निसर्गाचा लहरीपणा, जमिनीची कमी होत चाललेली उत्पादन क्षमता आणि सततची नापिकी यामुळे शेतकरी बेजार झालेला आहे. परंतु अशाही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथे राहणाऱ्या शोभा गायधने यांनी सेंद्रिय पध्दतीने हळद आणि इतर भाजीपाला लागवड करुन शेती फुलवली आहे.
सेंद्रिय शेतीतून होते पैशांची बचत
15 एकर शेतीमध्ये त्या गेल्या 21 वर्षांपासून सेंद्रिय पध्दतीने शेती करीत आहेत. रासायनिक खते आणि कीटक नाशकांचा वापर न करता दशपर्णी आणि निंबोळी अर्काचा वापर त्या शेतात करतात. त्यामुळे पैशांची बचत तर होतेच, सोबतच शेतीचा पोत देखील सुधारतो.
अनेक गोष्टींमधून होतो नफा
शोभा यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यामध्ये त्या प्रामुख्याने हळदीचे पीक घेतात आणि त्यासोबतच गहू, हरभरा, लिंबू, शेवगा यासह विविध प्रकारच्या भाजीपाल्याची आणि फळांची लागवड करुन आंतरपीके घेतात. 1 एकरला 12 ते 13 क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळते. हळदीसोबतच हळदीचे बेणे, कच्ची हळद, हळद पावडर विक्रीचे कामदेखील त्या करतात. तसेच गहू, हरभरा, लिंबू, शेवगा आणि भाजीपाला विक्री मधूनही त्यांना चांगला नफा मिळतो. या सर्व गोष्टींचा हिशोब लावल्यास खर्च वगळता वर्षाला 15 ते 16 लाख रुपयांचा नफा शोभा यांना शेती मधून होतो.
सरकारी योजनेचा लाभ
शेती निसर्गावर अवलंबून राहिल्यास अनेकदा नापिकिला तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शोभा यांनी सरकारच्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेतला आणि शेतात 50 मीटरचे शेततळे तयार केले. आता त्यांच्या शेतात 24 तास पाणी उपलब्ध असते. शोभा गायधने यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून स्वत:चा विकास साधलाच, शिवाय त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना देखील त्या मार्गदर्शन करीत असतात.