Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ONDC: आता ऑनलाईन फूड मागवा थेट सरकारी वेबसाईटवरून! स्विगी, झोमॅटोपेक्षा अधिक स्वस्त डिलिव्हरी…

ONDC

Open Network for Digital Commerce (ONDC), हा भारत सरकारचा एक अभिनव उपक्रम आहे. ई-कॉमर्स मार्केटमध्ये होत असलेले बदल लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा उपक्रम सुरु करण्याचा विचार केला आहे.आता ई-कॉमर्सवरून ऑर्डर करताना मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि त्यांना अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागणार नाही...

सध्या ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचा जमाना आहे. आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या मोबाईलवर आपल्याला खरेदी करता येतात. अगदी जेवण सुद्धा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. स्विगी आणि झोमॅटो या दोन महत्वाच्या फूड डिलिव्हरी कंपन्यानी या क्षेत्रात जम बसवला आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ हॉटेलमधून ग्राहकांना पोहोचवायचे आणि त्या बदल्यात ग्राहकांकडून शुल्क आकारायचे, अशा स्वरूपाचा व्यवसाय स्विगी आणि झोमॅटो करतात. या उद्योगातून कंपन्यांनी करोडो रुपयांचा नफा कमावला आहे. आता याच क्षेत्रात थेट केंद्र सरकारने उडी घेतली आहे. काय म्हणता, विश्वास बसत नाहीये? परंतु हे अगदी खरं आहे. चला तर जाणून घेऊयात नेमका सरकारचा काय प्लान आहे.

'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC)

'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC), हा भारत सरकारचा एक अभिनव उपक्रम आहे. ई-कॉमर्स मार्केटमध्ये होत असलेले बदल लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 पासून या योजनेवर सरकारचे काम सुरु होते आणि जुलै 2021 मध्ये त्यासाठी एक समितीसुद्धा नेमण्यात आली होती. ई-कॉमर्स मार्केटमधील मोठे खेळाडू ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर करत असून, त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी मंत्रालयाकडे वारंवार येत होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून सरकारनेच असे  डिजिटल कॉमर्सशी संबंधित नेटवर्क सुरु करावे ही कल्पना पुढे आली आणि ONDC उपक्रम सुरु केला गेला.

मध्यस्थांची गरज नाही!

स्विगी, झोमॅटो,अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या उत्पादकांकडून वस्तू घेतात आणि ग्राहकांना पोहोचवतात. या व्यवहारात पेमेंट गेटवे म्हणून गुगल पे, पेटीएम, रोझरपे सारख्या गेटवेचा वापर केला जातो. या गेटवे कंपन्यांना ग्राहकांची माहिती मात्र मिळत नाही. ती केवळ ई-कॉमर्स कंपन्यांनाच मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ONDC ने उत्पादक हॉटेल, कंपन्यांना ऑनबोर्ड करायला सुरुवात केली आहे. ऑनबोर्ड कंपन्यांकडून ग्राहक वस्तू खरेदी करू शकतील. पेमेंट गेटवेचा वापर करून पैसे भरल्यानंतर ग्राहकांची माहिती पेमेंट गेटवे कंपनी (Google Pay, RozerPay, Paytm etc) संबंधित कंपनीला ददिली जाईल, त्यांनतर ग्राहकांना त्यांच्या वस्तूंची डिलिव्हरी मिळेल.

या संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि त्यांना अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागणार नाही. याचा थेट फायदा ग्राहकांनाच मिळणार आहे. म्हणजेच जे खाद्यपदार्थ स्विगी, झोमॅटोवर तुम्ही ऑर्डर कराल तेच खाद्यपदार्थ कमी पैशात ONDC वरून ग्राहकांना मागवता येणार आहेत.

ONDC सध्या कुठे कार्यरत आहे?

'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ONDC) ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्वावर बेंगळूरू आणि मेरठ या शहरांमध्ये सुरु आहे. येणाऱ्या काळात इतर शहरांमध्ये देखील त्याचा प्रसार केला जाणार आहे. ONDC चा उपयोग केवळ स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरीपुरता मर्यादित नसून अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या इतर ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील यावर खरेदी करता येणार आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे खरेदी करताना ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत हे नक्की.

आव्हानांचा सामना करावा लागू शकतो

स्विगी, झोमॅटो,अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्याकडे वस्तूंची, खाद्यांनाची डिलिव्हरी करण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्समध्ये हॉटेल मालकांना, वस्तू उत्पादकांना स्वतःची वितरण व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. छोट्या हॉटेल व्यावसायिकांना याबाबत अडचणी येऊ शकतात.