Nagpur Oranges: नागपूरच्या संत्र्यांना दोनशे वर्षांचा इतिहास आहे. रघुजी राजे भोसले यांनी नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून आणलेल्या संत्र्याच्या कलमांची नागपुरात लागवड केली होती. तेव्हापासून नागपुरातील शेतात संत्र्याची लागवड केली जाऊ लागली. नागपूरातील संत्री हे मँडारिन गटात मोडतात. या संत्र्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे. विदर्भात संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हिरव्यागार संत्र्यांच्या बागांनी समृध्द असलेल्या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख आहे. संत्र्याचे सर्वाधिक उत्पन्न नागपूर आणि अमरावती मध्ये होते.
Table of contents [Show]
यावर्षीच्या संत्र्याची स्थिती
विदर्भात संत्र्याचे 90 हजार हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी पोषक असे वातावरण संत्री या फळाला न मिळाल्याने संत्र्यावर रोग आला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी संत्र्याची लागवड देखील कमी प्रमाणात केली होती. त्यामुळे जिथे शेतकऱ्यांना 7 ते 8 लाख टन उत्पन्न मिळायचे तिथे यावर्षी केवळ अडीच ते 3 लाख टन एवढेच उत्पन्न मिळाले.
संत्रा विक्रीची पद्धत आणि किंमत
शेतकऱ्याकडून व्यापारी लिलाव पद्धतीने संत्री विकत घेतात. तर काही व्यापारी शेतातच बोली लावून संत्री विकत घेतात. तसेच दररोज ग्रेड नुसार संत्र्याची किंमत ठरवली जाते. 20 किलो मध्ये किती फळ येतात, यावरुन संत्र्याची ग्रेड ठरवली जाते. 72 ते 75 एमएम साइज असलेली संत्री 20 किलो मध्ये केवळ 96 नगांचा समावेश होतो. यंदा बाजारात साधारण संत्र्यांची किंमत 15 हजार ते 25 हजार रुपये क्विंटल आहे. तर ए आणि बी ग्रेडच्या संत्र्याची किंमत 35 हजार रुपये क्विंटल आहे.
उत्पादकता कमी
आपल्या देशातील इतर राज्यापेक्षा आपल्या विदर्भातील संत्र्याची उत्पादकता फारच कमी आहे. पंजाब येथील संत्र्याची उत्पादकता प्रती हेक्टर 27 टन आहे. तर विदर्भातील उत्पादकता प्रती हेक्टर 8 टन आहे. विदर्भात क्लस्टर झाल्यास संत्र्याची उत्पादकता वाढेल आणि निर्यात करण्याचं क्षेत्र देखील वाढेल, अशी माहिती राज्यस्तरीय संस्था महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.
संत्र्यावर केली जाणारी प्रक्रिया
महाऑरेंजच्या वतीने अमरावतीतील मोर्शी आणि वर्धेतील कारंजा येथे संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन प्रकल्प उभारण्यात आले आहे. येथे संत्र्याचे ग्रेड ठरवले जाते. त्यानंतर त्यावर सिट्रस लिथरचा लेप लावला जातो. यामुळे संत्र्याची सेल्फ लाइफ वाढते. त्यानंतर त्याचे पॅकेजिंग केले जाते. 1 टन संत्र्यावर सिट्रस लिथरची प्रक्रिया करण्यासाठी 3.50 रुपयांचा खर्च येतो.
विदर्भातील संत्र्याची निर्यात
विदर्भातील संत्र्याचा सगळ्यात मोठा निर्यातदार बांग्लादेश आहे. विदर्भातील एकूण संत्र्याचा 35 % माल बांग्लादेश आयात करतो. परंतु आता बांग्लादेशने आयात शुल्क वाढवले आहे. गेल्या 4 ते 5 वर्षात बांग्लादेशने 20 रुपयांवरुन 88 रुपये आयात शुल्क वाढवले. त्यामुळे आता सिझन काळात 500 टन निर्यात होणारा माल आता केवळ 100 टनच निर्यात केला जातो.
संत्री निर्यात करतांना निर्यातदार (ब्रोकर) ची मदत घ्यावी लागते. ही संत्री अनेक दिवस टिकावी यासाठी मुंबई येथून रेफर कंटेनर आणावे लागतात. त्यानंतर सरकार तर्फे 2 ते 3 वेळा मालाची क्वालिटी तपासल्या जाते. केंद्र सरकारची कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ही संस्था देखील यासाठी मदत करीत असते.