शेत जमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास वारसाहक्कांने ती मालमत्ता मृताच्या वारसदारांच्या नावे केली जाते. यासाठी वारसदारांच्या नावांची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागत असत. त्यामुळे अनेकवेळा वेळ आणि पैसाही खर्च होतो. मात्र, राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची ही समस्या दूर केली आहे. आता वारसाची नोंदणी घरबसल्या मोबाईल अॅप किंवा महसूल विभागाच्या संकतेस्थळावरूनही करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे वारस नोंदणी प्रक्रिया करू शकतो, याबाबतची माहिती जाणून घेऊ..
वारस नोंदणीसाठी संकेतस्थळ
महाराष्ट्र सरकाराच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सातबारा उतारा काढणे, वारस नोंदणी करणे, फेरफार, उताऱ्यावर बोजा कमी करणे अथवा चढवणे, पीक पेरा प्रमाणपत्र इत्यादी माहिती ऑनलाईन आणि Hello Krushi App च्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही पद्धतीने नागरिकांना , शेतकऱ्यांना आता वारसाची नावे नोंद करता येणार आहेत.
संकेतस्थळावर वारस नोंदणी करणे
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने ऑनलाईन 7 /12 मधील माहितीमध्ये बदल करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये तुम्हाला एकूण क्षेत्रफळ, खातेदाराचे नाव, वारस नोंद इत्यादीसह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
असे करा लॉगिन-
वारस नोंद करण्यासाठी तुम्हाला या https://pdeigr.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करायचे आहे. यासाठी तुम्हाला न्यू युजर साईन अप (New User Sign Up) क्लिक करून Username यासह त्या ऑनलाईन अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती भरायची आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, ई-मेल, पत्ता पिन कोड टाकावा. त्यानंतर शेवटी कॅप्चा कोड टाकून माहिती सेव्ह करावी. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
वारसा नोंद प्रक्रिया-
लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही Details या पेजवर 7/12 mutations या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर User is Citizen असा पर्याय निवडा. त्यानंतर तिथे आलेल्या फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क या पेजवर वारस नोंद पर्याय निवडा. यामध्ये अर्जदाराची माहिती भरावी. त्यानंतर तुम्हाला ओके (OK) या बटनावर क्लिककरून ज्या सातबारावर वारस नोंद करायची आहे.त्या सातबारावरील खाते क्रमांक टाका. त्यानंतर खातेदाराचा गट नंबर टाकून संबंधित खातेदाराचा मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ही माहि्ती सबमिट केल्यानंतर तुम्हाला खातेधारकाच्या जमिनीची माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर अर्जदाराची माहिती आणि वारसांची माहिती भरा. वारसाचे मृतासोबतचे नाते निवडा. तसेच वारसांची नावे भरत असताना ती इंग्रजीत लिहून जन्मतारीख,वय,मोबाईल क्रमांक आणि पिनकोड टाका. यानंतर संपूर्ण माहिती जतन करा.
कागदपत्रे अपलोड करा-
ऑनलाईन वारसाची नोंद करत असताना वारसांची माहिती भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्क असलेल्या मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला.रेशन कार्ड यासह 8A उतारा, आधारकार्ड अपलोड करा. तसेच नावे लावण्यात आलेल्या वारसांचे शपथपत्रही संकेतस्थळावर अपलोड करावे. त्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणपत् दिसेल त्यावर तुम्ही सहमत या पर्यायावर क्लिक करा.
संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. तेथून तो अर्ज सर्कल यांच्याकडे मंजुरीसाठी गेल्यानंतर एकूण 18 दिवसात तुमच्या वारसा नोंदणी सातबारा उताऱ्यावर झालेली दिसून येईल.