Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filling: अन्य पोर्टलवरून ITR भरताय, मग चार्जेस पाहूनच भरा!

ITR Filling: अन्य पोर्टलवरून ITR भरताय, मग चार्जेस पाहूनच भरा!

Image Source : www.housing.com

इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्ही कोणतीही चाचपणी न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यास, तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्या पोर्टलवर चार्ज आहे आणि कोणत्या नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता 9 दिवस बाकी आहेत. जर तुम्ही वेळेत रिटर्न भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला ऑनलाईन बाबींची माहिती असल्यास तुम्ही तो घरबसल्या पाहिजे त्या मार्गाचा वापर करून भरू शकता. फक्त ते करत असताना तुम्ही कोणत्या पोर्टलचा वापर करत आहात हे पाहणे गरजेचे आहे. कारण, काही पोर्टल पैसे घेतात तर काही फ्रीमध्ये सेवा देतात. यामध्ये इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटद्वारे तुम्ही मोफत इन्कम टॅक्स भरू शकता. तर क्लियर(Clear), टॅक्सस्पॅनर (TaxSpanner), मायआयटीरिटर्न (MyITReturn), टॅक्सटूविन (Tax2Win), टॅक्सबडी(TaxBuddy), क्विको (Quicko) इत्यादीसारख्या ऑनलाईन थर्ड-पार्टी वेबसाईटवरूनही इन्कम टॅक्स भरण्याची मुभा आहे. पण त्यांचे काही चार्जेस आहेत. ते आपण जाणून घेऊया.

MyITReturn वर खास सवलत

MyITReturn पोर्टल हे मोफत सेवा देणारे पोर्टल असून, ज्यांचे इन्कम जास्त आहे, म्हणजेच जे व्यावसायिक आहेत किंवा ज्यांची सॅलरी जास्त आहे. अशाच ग्राहकांकडून ते चार्जेस घेतात.  यांची विशेष गोष्ट म्हणजे ते बरोजगार, विधवा, गृहिणी आणि रिटायर्ड व्यक्तींकडून इन्कम टॅक्स भरताना कोणताही चार्ज घेत नाहीत.

1 लाखापर्यंत मोफत!

Tax2Win वर भरत असल्यास येथे एक खास सवलत आहे. तुमचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असले, तर तुम्ही मोफत रिटर्न भरू शकता. मात्र, 1 लाखापेक्षा जास्त असल्यास काही चार्जेस भरावे लागू शकतात.  

तज्ज्ञांकडून भरल्यास अधिक पैसे!

सुरूवातीला Clear ने  फक्त प्रवेश स्तर किंवा साधी ITR भरण्याची सेवा मोफत ठेवली होती. मात्र, मागील वर्षापासून, Clear ने साध्या ITR फाइलिंग सेवेसाठी चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. 151 रुपयांच्या सवलतीनंतर आता त्याची किंमत 299 रुपये (जीएसटी वगळता) आहे. जर तुम्ही Clear वर तज्ज्ञांकडून ITR भरुन घेत असल्यास, त्याचे तुम्हाला अधिक चार्जेस द्यावे लागू शकतात.

अतिरिक्त 1000 रुपये चार्जेस

इन्कम टॅक्स भरताना टॅक्सस्पॅनरने (TaxSpanner) भांडवली नफा, नुकसान यासाठी कोणतीही सवलत दिलेली नाही. जर तुम्ही Taxspanner द्वारे ITR भरला तर 1000 रुपये जास्तीचे चार्जेस भरावे लागू शकतात.

‘या’ आहेत विविध सेवा!

वरील काही पोर्टलवर तुम्हाला जर तज्ज्ञांचे सहाय्य हवे असल्यास किंवा संगणकाच्या सहाय्याने भरुन घ्यायचे असल्यास त्याचे ही वेगळे चार्जेस भरावे लागू शकतात.  त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ काॅलद्वारे भरुन घ्यायचे असल्यास, त्याचे चार्जेस मिनिंटाप्रमाणे ठरले आहे. या सुविधा मात्र काहीच पोर्टल देतात. त्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्यापूर्वी संबंधित पोर्टलवर चार्जेस पाहून भरणेच योग्य ठरेल. एवढ्या सगळ्या बाबी करायला अवघड वाटत असल्यास, भारत सरकारच्या आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटद्वारे तुम्ही मोफत इन्कम टॅक्स भरू शकता. हे कधीही फायद्याचं ठरेल.