तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ONGC - Oil and Natural Gas Corporation) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 26 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. ओएनजीसी (ONGC) ने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, उत्पन्नात 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सीएनबीसी आवाज च्या मते, कंपनीचे उत्पन्न आणि नफा दोन्ही अपेक्षेपेक्षा कमी आहे. ऑफशोअर विभागातील उत्पन्नात 39 टक्के वाढ झाली आहे आणि ऑनशोअर उत्पन्नात 28 टक्के वाढ झाली आहे. ओएनजीसीचा स्टॉक मंगळवारच्या व्यवहारात वाढीसह बंद झाला. कंपनीने प्रति शेअर 4 रुपये लाभांशही (Dividents) जाहीर केला आहे.
स्टॉकची कामगिरी कशी झाली?
तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 26 टक्क्यांनी वाढून 11044.7 कोटी रुपये झाला आहे. पण अंदाज 12 हजार कोटी रुपये होता. गेल्या वर्षी कंपनीचे उत्पन्न 8763.72 कोटी रुपये होते. त्याच वेळी, व्यवसायाद्वारे कंपनीचे उत्पन्न 38583 कोटी रुपये आहे. तर अंदाज 39242 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी ओएनजीसीचे उत्पन्न 28473 कोटी रुपये होते.
दुसरीकडे, जर आपण ऑफशोअर विभागाबद्दल बोललो तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑफशोअर सेगमेंटचे उत्पन्न 39 टक्क्यांनी वाढून 25936 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, ऑनशोअर सेगमेंटचे उत्पन्न 29 टक्क्यांनी वाढून 12647 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनीने काय म्हटलं ?
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला (Stock Exchange) सूचनेत म्हटले आहे की, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत त्यांना 11,044.73 कोटी रुपये म्हणजेच प्रति शेअर 8.78 रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीने 8,763.72 कोटी रुपये किंवा प्रति शेअर 6.97 रुपये एवढा नफा कमावला होता. हा नफा मात्र जुलै-सप्टेंबर तिमाहीतील 12,825.99 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने उत्पादित केलेले आणि विकले जाणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्याकडून जास्त प्राप्ती झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली. तिसऱ्या तिमाहीत, ओएनजीसीने कच्च्या तेलाच्या विक्रीतून प्रति बॅरल 87.13 डॉलर कमावले. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 75.73 डॉलर प्रति बॅरल होता. वीज निर्मिती, खत निर्मिती आणि वाहनांमध्ये सीएनजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत या तिमाहीत प्रति युनिट 8.57 डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 2.90 डॉलर प्रति युनिट होती. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 53.9 लाख टन कच्च्या तेलाचे उत्पादन केले. मागील वर्षी याच कालावधीत ते 54.5 लाख टन होते. गॅसचे उत्पादन सुमारे चार टक्क्यांनी घटून 5.35 अब्ज घनमीटर झाले.