Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zomato : झोमॅटोवर दोन गुलाबजाम 400 रुपयांमध्ये! ग्राहकांनो फसवणूक होताना लक्ष देण्याची गरज!

Zomato

Image Source : www.pixlok.com

झोमॅटोवरुन मिठाई मागवताना एका व्यक्तीला त्या मिठाईची मूळ किंमत पाहून आश्चर्य वाटले. त्याने लगेचच त्याचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला. त्यावर झोमॅटोने (Zomato) काय प्रतिक्रिया दिली? ते जाणून घेतानाच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना त्यांची फसवणूक तर होत नाही ना? आणि तसे झाल्यास काय करावे? ते पाहूया.

गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत? बहुतेक लोक मिठाईच्या दुकानांकडे वळतात किंवा घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करतात. पण फूड डिलिव्हरी अॅपवर वाजवी किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त गोड पदार्थ पाहिल्यावर कोणाला राग येणार नाही? एका व्यक्तीला झोमॅटो अॅपवरून (Zomato App) गुलाबजाम मागवायचे होते तेव्हाही असेच घडले. अॅपवर गुलाबजामच्या दोन नगांची 400 रुपये किंमत पाहून त्यांना धक्काच बसला. मग काय? त्या व्यक्तीने स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर केला, जो व्हायरल झाला आहे. आता या पोस्टवर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. दरम्यान या गोष्टीमुळे लक्षात येते की, ग्राहकांनी ऑनलाईन वस्तू खरेदी करताना त्या वस्तूंची मूळ किंमत आणि खरेदी किंमत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच ग्राहकाने काय करावे? ते पाहूया.

ट्विटरवर काय म्हटले आहे?

ट्विटरवर भूपेंद्र नावाच्या युजरने स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, 'दोन गुलाब जामूनसाठी 400 रुपये, गाजराचा हलवा 3000 रुपये प्रति किलो... तेही 80 टक्के सूटसह. ते इतके स्वस्त आहे यावर विश्वास बसत नाही. मी खरंच 2023 मध्ये राहतो का? यासोबतच युजरने झोमॅटोवर टोमणे मारत लिहिले आहे, तुमच्या उदारतेबद्दल धन्यवाद. भूपेंद्रच्या या ट्विटने सोशल मीडियावर केवळ फूड डिलिव्हरी अॅप्सवरच नव्हे तर इतर शॉपिंग वेबसाइट्सवरही किमतींबद्दल नव्या वादाला तोंड फोडले आहे. ग्राहकांना फसवण्यासाठी कंपन्या सवलतीचे निमित्त देतात, असे लोकांचे म्हणणे आहे.

झोमॅटो काय म्हणाले?

यावर उत्तर देताना झोमॅटोने लिहिले आहे की, 'हाय भूपेंद्र… आम्हाला याची चौकशी करायला आवडेल. कृपया आमच्यासोबत DM द्वारे रेस्टॉरंटचे तपशील शेअर करा. आम्ही किमती निश्चित करण्यासाठी रेस्टॉरंटशी संपर्क साधू. असाच अनुभव शेअर करताना आणखी एका ट्विटर युजरने लिहिले की, “ही मोठी सवलत आहे, मी 1000 रुपयांची कोल्ड कॉफी पाहिली, पण ती नंतर 120 रुपयांची झाली.”

फसवणूकीविरुद्ध तक्रार करा

ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.या हेल्पलाईन विनाशुल्क उपलब्ध असून यावर ग्राहकांना मोफत माहिती, सल्ला तसेच मार्गदर्शन मिळते. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा ग्राहकांनी फायदा घ्यायला पाहिजे. वस्तू खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रार करण्याची अनेक ग्राहकांची इच्छा असते. मात्र, तक्रार नेमकी कुठे करायची याबद्दलची माहिती ग्राहकांना नसते त्याबद्दल जाणून घेऊया.

राज्य ग्राहक हेल्पलाईन

राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून ही ग्राहक हेल्पलाईन सुरू आहे. या विनाशुल्कहेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक 1800 22 2262 हा आहे. टेलिफोनद्वारे ग्राहकांच्या समस्येबाबत असलेली माहिती मिळण्यासाठी राज्य ग्राहक हेल्पलाईन उपयोगी ठरते. राज्य ग्राहक हेल्पलाईन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. राज्य सरकारने ही हेल्पलाईन सुरू करण्यासाठी मुंबईतील ‘कन्झ्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या हेल्पलाईनचा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1800 11 4000 असा आहे. आपल्या शंका आणि तक्रारींसाठी, सल्ला आणि मार्गदर्शनासाठी ग्राहक या टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकतात. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेतील ‘सेंटर फॉर कन्झ्युमर स्टडीज’ मार्फत ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन चालवली जाते.

तक्रार नोंदविण्याचे अन्य पर्याय

  • ग्राहक https://edaakhil.nic.in/index.html पोर्टलद्वारे जिल्हा आयोग किंवा राज्य आयोगात किंवा राष्‍ट्रीय आयोगात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तक्रार दाखल करू शकतात.
  • https://consumerhelpline.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ग्राहक तक्रार करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.
  • ग्राहक ‘उमंग’ या मोबाईल अँप्लिकेशन द्वारे तक्रार नोंदवू शकतात.
  • एनसीएच (NCH) या अ‍ॅपमार्फत सुद्धा तक्रार करू शकतात.
  • ग्राहक 8800 11 1915 या क्रमांकावर एसएमएस(SMS) करू शकतात.