Old Car Sale: मेट्रो शहरांबरोबर देशातील छोट्या शहरांमध्येही जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. जे ग्राहक परवडणाऱ्या दरात आणि चांगली गाडी शोधत आहेत ते नव्या कारऐवजी जुन्या गाड्यांना पसंती देत आहेत. CARS24 या सेकंड हँड गाड्यांच्या खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मवर एप्रिल-जून या तिमाहीत 1,800 कोटी रुपयांच्या गाड्यांची विक्री झाली.
तासाला 30 गाड्यांची विक्री
कार्स 24 प्लॅटफॉर्मवरून तासाला 30 गाड्यांची सरासरी विक्री झाली. दिल्ली, बंगळुरू, मुंबई अशा मेट्रो शहरांसोबतच पुणे, अहमदाबाद शहरातही गाड्यांची विक्री वाढली आहे. 2022 सालातील (एप्रिल-जून) बरोबर तुलना करता यावर्षी 87% वाढ कंपनीने नोंदवली आहे. कार खरेदीबाबत ग्राहकांचा कल बदलत असल्याचे यातून दिसून येते. फक्त नवी कारच नाही तर जुन्या कारची डिमांडही सकारात्मक आहे.
कोणत्या कार्सला सर्वात जास्त मागणी
एकूण जुन्या कारच्या विक्रीपैकी 62 टक्के गाड्या हॅचबॅक श्रेणीतील आहेत. म्हणजेच हॅचबॅक गाड्या खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती आहे. त्याखालोखाल सेदान श्रेणीतील गाड्यांना डिमांड आहे. पुणे, अहमदाबाद, कोची, चंदीगढ, पटना, लखनऊ, जयपूर आणि सुरत सारख्या शहरांमध्ये जुन्या गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
गाड्यांची विक्री वाढण्यामागील कारणे?
कार्स 24 सह इतरही जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करताना ग्राहकांना सुलभ वाहन कर्जाची उपलब्धता झाली आहे. डिजिटल पद्धतीने कमी वेळात कर्जाचा पुरवठा केला जात आहे. तसेच जुन्या गाड्यांची संख्या वाढत असल्याने ग्राहकांपुढे अनेक पर्याय आहेत.
स्पीनी, कार देखो, ओएलएक्स ऑटो, कारट्रेड, महिंद्रा फर्स्ट चॉइस, ड्रूम असे इतरही अनेक कार खरेदी विक्रीसाठी पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या सर्व प्लॅटफॉर्मवरील सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्री वाढत आहे.