कॅब बुकिंग (Cab booking) सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ओला वरच्या क्रमांकावर येते. मात्र सध्या कंपनीची आर्थिक अवस्था फारशी चांगली नसल्याचं दिसतंय. टीव्ही 9नं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. ओलासमोर मोठं आर्थिक संकट (Financial crisis) उभं राहिलंय. काही महिन्यांपासून ओलाच्या मूल्यांकनात सातत्यानं घसरण होत चाललीय. निधीची कमतरता असल्याचं कारण यासाठी सांगितलं जातंय. विशेष म्हणजे मागच्या 9 वर्षात सर्वात कमी निधी ओलाला मिळालाय.
Table of contents [Show]
तोट्यात वाढ
निधीची कमतरता कंपनीसाठी मोठं आव्हान आहे. निधी नसेल तर बाजारात कसं टिकून राहायचं, याचा विचार कंपनीला करावा लागतोय. तोटा वाढत चाललाय. अशा परिस्थितीत ओलाला सेवा बंद करावी लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. पाहू या नेमकं काय घडलं...
एएनआय टेक्नॉलॉजीजच्या मूल्यांकनात घट
एएनआय टेक्नॉलॉजीजच्या मूल्यांकनात सुमारे 35 टक्क्यांनी मोठी घसरण झालीय. निधीची कमतरता हे यामागचं प्रमुख कारण आहे. एएनआय टेक्नॉलॉजीज (ANI Technologies) ही ऑनलाइन कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म ओलाची मूळ कंपनी आहे. ओलाचं मूल्यांकन 7.4 अब्ज डॉलरवरून 4.8 बिलियन डॉलरवर आलंय. एकीकडे जागतिक आर्थिक संकट आहे. भारतातले स्टार्टअप्स, छोट्या कंपन्या निधीच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. अशातच आता ओलालाही निधीच्याच समस्येनं ग्रासलंय.
सर्वात कमी निधी
यंदा ओलाला सर्वात कमी निधी मिळालाय. एप्रिल 2023चा विचार करता मागच्या 9 वर्षातला सर्वात कमी निधी मिळाला आहे. सध्या ओलाला बाजारात टिकून राहण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यासाठी ओलाचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. मात्र त्यात अपेक्षित यश न मिळाल्यास सेवा देण्यासंदर्भात गंभीर विचार कंपनीला करावा लागणार आहे. ओलाचं मूल्यांकन सध्या 35 टक्क्यांनी कमी होऊन 4.8 अब्ज झालंय. 2020च्या सुरुवातीला ओलाचं मूल्यांकन 45 टक्क्यांनी घसरलं होतं. तर 2021मध्ये 9.5 टक्क्यांनी घसरलं. ही आकडेवारी पाहता यावर्षी सर्वात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
इंधन दरवाढीचा फटका
इंधनाच्या दरवाढीचा सर्वांनाच फटका बसलाय. डिझेल आणि पेट्रोलच्या या वाढलेल्या किंमतींमुळे ओलानं यूझ्ड कारची सेवा आधीच बंद केलीय. जेव्हा देशात युज्ड कार सेवेची क्रेझ होती, अधिक मागणी होती, अशावेळी ओलानं ही सर्व्हिस बंद केली होती. लाँच झाल्याच्या वर्षभरातच ही सर्व्हिस बंद करण्यात आली होती. आता निधीचा अभाव आणि सातत्यानं होणारी मूल्यांकनातली घसरण यामुळे तोटा वाढला. त्यामुळे कॅब सर्व्हिसही बंद करावी लागतेय की काय, अशी स्थिती आहे.
आयपीओ आणण्याची तयारी, पण...
कंपनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात लिस्टिंगसह आयपीओ (IPO) आणण्याचा विचार करत आहे. मात्र त्याआधीच कंपनीवर अशी वेळ आलीय. कंपनी पुढच्या वर्षी शेअर बाजारात आपला राइड-शेअरिंग व्यवसाय लिस्ट करण्यासाठी खरंतर तयारच आहे. आयपीओच्या माध्यमातून पैसा उभारून व्यवसाय पुढं नेणं, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. आता या वर्षभरात काय घडामोडी घडतात, निधी मिळतो का, तोटा भरून निघेल का, असे विविध प्रश्न कंपनीसमोर आहेत.