जागतिक बँकेने अमेरिका आणि इतर देशात महामंदीची चिंता व्यक्त केली आहे. त्याचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्येही पडझड होण्याची शक्यता. मात्र, भारतामध्ये कोरोना साथीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांची मागणी वाढतच आहे. बंगळुरू शहरामध्ये अनिवासी भारतीय (NRI investment in Bangalor) स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आलिशान अपार्टमेंट्ससोबत इतर व्यावसायिक आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरू आहे.
NRI गुंतवणूक वाढण्यामागील कारण काय?
मागील काही दिवसांपासून डॉलरचे मूल्य वाढले असून रुपया कमकुवत झाला आहे. या संधीचा फायदा अनिवासी भारतीय उठवत आहेत. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागत आहेत. बंगळुरु शहराच्या भोवताली अनेक नवीन प्रकल्प येत आहे. त्यातील आलिशान गृह आणि व्यावसायिक प्रकल्पात NRI गुंतवणूक करत आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मागणी वाढली आहे. येत्या काळात या क्षेत्राची वाढ अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांना या गुंतवणूक पर्यायाने आकर्षित केले आहे.
बंगळुरु शहरात स्थावर मालमत्तेचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहराच्या बाजूने असलेल्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक भागात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. तसेच जमीनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहारही तेजीत आहेत. बंगळुरुतील निमशहरी भागातही अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन विकासक हे प्रकल्प उभे करत आहेत. त्यांना पैशाचा पुरवठा NRI कडून वाढल्याचे अनेक विकासकांचे म्हणणे आहे. नुकतेच बंगळुरू-मैसुर द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे केनगेरी सारख्या औद्योगिक भागातही गुंतवणूक वाढली आहे.
पूर भागातील जागांना मागणी नाही
बंगळुरू शहरात मागील काही महिन्यांपूर्वी मोठा पूर आला होता. यावेळी पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले होते. अनेक दिवस शहरातून पाणी गेले नव्हते. उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याने तारांबळ उडाली होती. त्यामुळे अनिवासी भारतीय गुंतवणूक करताना पूरग्रस्त भागातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत नाहीत. स्थानिक भौगोलिक पसिस्थितीबाबत आता एनआरआय जागरुक झाले आहेत. बेकलांदुर आणि सुरजपूर या भागातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना एनआरआय जागेचा क्लिअरन्स तपासत आहेत, असे विकासकांचे म्हणणे आहे. अन्यथा प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे.