NPS Withdrawal Rules Changed For Central Government Employees: पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने अर्थात PFRDA नॅशनल पेन्शन सिस्टममधून ठराविक रक्कम काढण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. सर्व नियम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. यापुढे ठराविक रक्कम काढण्याचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांनादेखील हा नियम लागू असणार आहे. त्यामुळे आता एनपीएसच्या अर्थात राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (National Pension System) गुंतवणूकदारांना मुदतीपूर्वी पैसे काढण्याची कारणे अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असणार आहे आणि त्यासंदर्भातील कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत.
पीएफआरडीएने यापूर्वी सेल्फ डिक्लेरेशन अंतर्गत गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. हा नियम 14 जानेवारी 2021 रोजी कोव्हीड महामारीच्या काळात लागू करण्यात आला होता. पीएफआरडीएने म्हटले की, 'महामारीशी संबंधित अडचणी संपल्यानंतर आणि लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर परिस्थिती आणि कायदा लक्षात घेऊन तपास करण्यात आला. यानंतर, सर्व सरकारी क्षेत्रांसाठी ठराविक रक्कम काढण्याचा हा नियम बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किती पैसे काढता येतील? (How much can be withdrawn?)-
नॅशनल पेन्शन सिस्टीम, मॅच्युरिटीपूर्वी किंवा तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी देते. परंतु, संभाव्य काढण्याची रक्कम एकूण योगदानाच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. एनपीएसमधून मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम आणि गंभीर आजारांवर उपचार आदी कारणांसाठी अकाली पैसे काढता येतात. एनपीएसमधील गुंतवणुकदार संपूर्ण कार्यकाळात केवळ तीन वेळा आंशिक पैसे काढू शकतो.
दीर्घकालीन गुंतवणूक योजना (Long term investment plan)-
एनपीएस ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीची प्रणाली म्हणून मानली जाते. या योजनेत नोकरीदरम्यान पैसे जमा केले जातात, जे निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळतात. 18 ते 60 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील व्यक्ती एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते. ही योजना थेट सरकारशी संबंधित आहे. एनपीएसमध्ये, गुंतवणूकदाराला सेक्शन 80 सी आणि सेक्शन 80 सीसीडीच्या अंतर्गत 50 हजारांपर्यंत अतिरिक्त आयकर सूट मिळते.
गुंतवणूकदाराला एनपीएसमध्ये जमा केलेले पैसे दोन प्रकारे मिळतात. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही जमा केलेल्या रकमेचा मर्यादित भाग एकाच वेळी काढू शकता, तर दुसरा भाग पेन्शनसाठी ठेवला जाईल. या रकमेतून अॅन्युइटी (Annuity) खरेदी केली जाईल, तुम्ही अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी जितकी जास्त रक्कम सोडाल, तितकी जास्त पेन्शन तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळेल. तुम्ही या योजनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.