कोव्हिडच्या उद्रेकानंतर आता कुठे जग खुलं झालं आहे. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवास, मग तो कामासाठी असो की पर्यटनासाठी, सुरू झाला आहे. त्याचवेळी कोव्हिडमुळे अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. अशावेळी इतर क्षेत्रांप्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही सवलतीचं वारं सुरू झालं आहे. म्हणजे आधी प्रवास करा आणि मग हप्त्या हप्त्याने पैसे द्या अशी योजना काही टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.
तर काही बँकांनी लोकांना वैयक्तिक कर्जा अंतर्गत चक्क ट्रॅव्हल किंवा व्हेकेशन लोन देऊ केलं आहे. यात अगदी आघाडीच्या ICICI, HDFC, स्टेट बँक अशा सगळ्या सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश आहे. कर्ज काढून सण साजरा करू नये असं म्हणतात. पण, तुम्ही हप्त्याने पैसे भरणार असाल किंवा क्रेडिट कार्डाने पर्यटनाचा खर्च करणार असाल, तर ट्रॅव्हल लोनचा पर्याय त्याहून नक्कीच चांगला आहे. कसा ते बघा.
Table of contents [Show]
ट्रॅव्हल लोन म्हणजे काय?
अनेकदा आपल्याला सहकुटुंबं कामासाठी किंवा सहलीसाठी जायचं असतं. पण, तेव्हा ही सहल आपल्या ‘बजेट’च्या बाहेर असते. तिकिटाचा खर्च, हिंडण्या-फिरण्याचा खर्च तसंच अगदी शॉपिंगचा खर्च असे सगळे खर्च आवासून उभे असतात. आणि वेळी जर कमी मुदतीचं कर्ज हवं असेल, तर बँका तुम्हाला मदत करू शकतात.
'ट्रॅव्हल लोन(Travel Loan)' हे आपल्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास उपलब्ध असलेले एक वैयक्तिक कर्ज आहे. अगदी कमीत कमी कागदपत्रं आणि तुमचा तगडा सिबिल स्कोर(750 पर्यंत) यासाठी असावा लागतो.
विशेष म्हणजे तुमचं खातं असलेली बँकच तुम्हाला कर्ज देणार असेल, तर अगदी 5-10 मिनिटांत तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमाही होऊ शकते. दुसऱ्या बँकेत अर्ज करत असाल, तर अर्धा किंवा एखादा दिवस जाऊ शकतो. आता हे सगळं वाचल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न आले असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या लेखातून जाणून घ्या.
ट्रॅव्हल लोनचे फायदे काय?
- क्रेडिट कार्डवरील लेट फी आणि व्याजदरापेक्षा ट्रॅव्हल लोनचे व्याजदर अतिशय कमी असते
- शिवाय क्रेडिट कार्डासारखी देय रक्कम एकाच हप्त्यात चुकवावी लागत नाही
- ग्राहकाला अतिशय कमी वेळेत आणि कमी कागदपत्रांसह या लोनची पूर्तता करण्यात येते
- बँकेची पद्धतशीर EMI पद्धत असल्याने ग्राहकाला हप्ता भरणे सहज शक्य होते, यासाठीची अर्ज प्रक्रियाही अतिशय सोपी असते
- कमी पगार असणारे नोकरदारही यासाठी सहजरित्या अर्ज करू शकतात
- तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ही विमानाचे तिकीट बुक करण्यापासून ते हॉटेलची बिलं भरण्यापर्यंत किंवा इतर कोणत्याही प्रवास खर्चासाठी वापरता येते. अगदी शॉपिंगसाठीही तुम्ही पैसे वापरू शकता
ट्रॅव्हल लोन घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात
- तुम्ही कुठे आणि किती जण प्रवासासाठी जाणार आहेत हे निश्चित करा
- ठिकाण निश्चित झाल्यानंतर बजेटचा अंदाज घ्या, एकूण रकमेपैकी तुम्ही किती रक्कम डाऊनपेमेंट स्वरूपात भरू शकता याचा अंदाज घेऊन उर्वरित रकमेचे कर्ज घ्या
- कर्जाचा टर्म कालावधी तपासून घ्या. ज्यावर आधारित तुम्हाला दर महिन्याला किंवा वर्षभरात किती हप्ते भरावे लागतील याचे कॅल्क्युलेशन करावे लागेल
- ट्रॅव्हल लोनकरिता अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा
- लोन घेण्यापूर्वी मार्केटमध्ये कोणत्या संस्था किंवा बँका किती व्याजदराने लोन देतात हे नीट तपासा आणि कमीत कमी व्याजदर निवडा
ट्रॅव्हल लोनचे व्यवस्थापन कसं करावं?
ट्रॅव्हल लोन हे शेवटी कर्ज आहे आणि त्याची परतफेड करणं हे आपल्यावरचं एक दायित्व आहे, याचं भान मात्र कर्ज घेणाऱ्यांनी ठेवायला हवं. कारण कर्जाचे हप्ते थकले तर बँकेचा त्रास पाठी लागू शकतो.
अर्थविषयक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनीही महामनीशी बोलताना याच मुद्याकडे बोट दाखवलं. ‘खरंतर पर्यटनासारख्या चैनीच्या गोष्टीसाठी कर्ज घेऊ नये या मताचा मी आहे. पण, घेतलंच तर त्याचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण, है वैयक्तिक कर्ज प्रकारात येत असल्यामुळे व्याजदर चढा आहे. अशावेळी हप्ता कमी बसावा म्हणून कालावधी वाढवण्याकडे लोकांचा कल असतो. पण, तेच धोक्याचं आहे. कमी कालावधीत व्याज जास्त द्यायला लागतं हे आपण विसरतो,’ कुलकर्णी यांनी आपला पहिला मुद्दा मांडला.
याशिवाय वसंत कुलकर्णी यांच्या मते कर्ज किती घ्यावं याचाही विचार आधीच झाला पाहिजे. ते म्हणतात, ‘कुठलंही कर्ज घेताना गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून आम्ही एक नियम सांगतो. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 4-5% इतकाच हप्ता असायला हवा. त्यापेक्षा जास्त कर्ज शक्यतो घेऊ नये.’
त्यामुळे तुमचा महिन्याचा इतर खर्चही तुम्ही सांभाळू शकाल असं कुलकर्णी यांना वाटतं. म्हणजेच पर्यटनाचा खर्च किती होणार आहे याचा आधी अंदाज घेऊन, त्यातला किती तुम्ही इतर मार्गांनी उभा करू शकता ते प्रमाण ठरवून उर्वरित रकमेचं कर्ज घेणं कधीही चांगलं.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेतल्यावर कर्ज काही कारणांनी फेडता आलं नाही किंवा हप्ते चुकले तर बँकेकडून काही सोय आहे का, कर्जाची पुनर्रचना कशी होते, याची माहितीही करून घेणं आवश्यक आहे.
ही काही पथ्य पाळलीत, तर ड्रीन डेस्टिनेशनला जाण्यासाठी ट्रॅव्हल लोनचा पर्याय स्वीकारायला हरकत नाही.