भारतात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) ही एक रॉयल बाइक समजली जाते. महागडी असूनदेखील अनेकांना ती आपल्याकडे असावी, असं वाटत. या धर्तीवर इतर कंपन्यांनी प्रयत्न केले. यात होंडा (Honda) आणि क्लासिक लिजन्ड्स (जावा आणि येझ्डी ब्रँड्सचे मालक) यासारख्या प्रस्थापित ब्रँड्सनीही रॉयल एनफिल्डला पहिल्या स्थानावरून हटवण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र अजूनतरी कोणालाही यश मिळालं नाही.
Table of contents [Show]
रोनिनची झाली होती एन्ट्री
टीव्हीएसनं मागच्या वर्षी रोनिन लाँच करून या प्रकारात एन्ट्री केली होती. मात्र डिझाइन फारशी आकर्षक नसल्यानं कंपनीला यात प्रगती करता आली नाही. आता रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करण्यासाठी आणखी एक बाइक बाजारात दाखल होणार आहे. नॉर्टन कॉम्बॅट असं या बाइकचं नाव असून या बाइकला भारतात ट्रेडमार्क केलं गेलं आहे.
टीव्हीएसनं केलं अधिग्रहण
ब्रिटीश मोटारसायकल निर्माता नॉर्टननं भारतात 'कॉम्बॅट' नावाच्या उत्पादनासाठी ट्रेडमार्क दाखल केला. आयकॉनिक ब्रँड ही टीव्हीएस मोटर कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि त्यामुळे नॉर्टन भारतात लॉन्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीव्हीएसनं एप्रिल 2020 मध्ये नॉर्टनला 153 कोटी रुपयांना विकत घेतलं.
ब्रँडच्या लाइनअपमध्ये सुधारणा
टीव्हीएसनं नॉर्टन विकत घेतल्यापासून, या ब्रिटीश ब्रँडच्या संपूर्ण लाइनअपमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यात आता व्हीफोरसीआर (V4CR), व्हीफोरएसव्ही (V4SV) आणि अलीकडेच लाँच झालेल्या कमांडो 961 यांचा समावेश आहे.
हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फचं आधीच वर्चस्व
नॉर्टनबद्दल अद्याप कोणतंही अपडेट समोर आलेलं नाही. मात्र लोकप्रियता आणि मागणी लक्षात घेता, भारतात टीव्हीएस नॉर्टन ब्रँडिंगसह 400-500cc श्रेणीमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या सेगमेंटमध्ये हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फ यासारख्या अधिक प्रीमियम मोटारसायकली वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत नॉर्टनच्या एन्ट्रीमुळे भारतीय ग्राहकांसाठी अनेक पर्याय खुले होणार आहेत. ट्रेडमार्क मिळाला म्हणजे लॉन्चची हमी नाही. मात्र भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या सरकारमध्ये व्यापार कराराच्या सुरू असलेल्या चर्चेमुळे भविष्यात ही बाइक भारतात येण्याची शक्यता आहे.