Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Noma Restaurant Closing Down : जगातलं हे अव्वल रेस्टॉरंट बंद होतंय. मग त्याची एवढी चर्चा का?  

Noma Restaurant

Image Source : www.hindustantimes.com

Noma Restaurant Closing Down : डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथलं नोमा हे जगप्रसिद्ध रेस्टॉरंट. 2003 पासून सातत्याने हे हॉटेल जगातल्या पहिल्या पन्नास रेस्टॉरंटमध्ये पाचात असायचं. यात पाचवेळा ते जगात भारी ठरलं होतं. असं हे रेस्टॉरंट आता बंद होतंय. आणि त्याची चर्चा अगदी भारतातही होतेय. काय आहे असं विशेष या रेस्टॉरंटमध्ये?

डेन्मार्कची (Denmark) राजधानी कोपनहेगनला (Copenhagen) जगाची खाद्यपदार्थांची राजधानी असं म्हणतात. पर्यंटन क्षेत्रात (World Tourism) तरी तिचं वर्णन असंच केलं जातं. का माहीत आहे? तिथल्या नोमा (Noma Restaurant) या रेस्टॉरंटमुळे! नोमा हे नाव नोमॅड (Nomad) या इंग्रजी शब्दातूनच तिथले मालक आणि शेफ रिनी रेडझेपी (Rene Redzepi) यांना सुचलंय. स्थानिक उपलब्ध साहित्यातून ते उत्तमोत्तम रेसिपी (Recipe) बनवता असा त्यांचा लौकिक आहे. आणि त्यातूनच ते फक्त डेन्मार्कमध्ये नाही तर जगात नावारुपाला आले. आणि तिथूनच नोमा हे डॅनिशच नाही तर परदेशी पर्यटकांचंही लाडकं रेस्टॉरंट बनलं.

पण, आता 2024 चा स्थानिक हंगाम संपला की हे रेस्टॉरंट बंद करू असं रेडझेपी यांनी सगळ्यांना कळवलंय. आणि तेव्हापासून इंटरनेटवर नोमाचीच चर्चा होतेय.

नोमा रेस्टॉरंट कशामुळे प्रसिद्ध आहे?

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथं मध्यवर्ती ठिकाणी हे रेस्टॉरंट आहे. 2003 मध्ये शेफ रिनी रेडझेपी यांनी त्याची स्थापना केली. खाद्यपदार्थांमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा खास भर स्थानिक शेतात आणि जंगलात मिळणाऱ्या साहित्याचा रेसिपीमध्ये उपयोग करण्यावर आहे. पण, अशा प्रयोगांमधून त्यांनी जगाला उत्तमोत्तम अशा नवीन डिशेस् दिल्या. डेन्मार्कमध्ये हिवाळा कडक असतो. पण, तोच तिथला महत्त्वाचा हंगाम असल्यामुळे अशा हंगामात नोमा रेस्टॉरंटमध्ये बनणाऱ्या पदार्थांमध्ये सिका हरीण, गेम बर्ड्स, रेनडिअर यांचं मांस यांचा वापर होतो. आणि स्थानिक जंगलात मिळणारी बेरी फळं तसंच मशरुम वापरून नवीन डिश बनवल्या जातात. या सगळ्या रेसिपी रेडझेपी यांनी तयार केल्या आहेत. तिथलं स्मोक्ड मशरुम गरुम सगळ्या जगात लोकप्रिय आहे.

असं हे रेस्टॉरंट स्थापना झाल्यापासून चर्चेत होतं. पण, 2010 मध्ये पहिल्यांदा त्याने जगातल्या पहिल्या 50 रेस्टॉरंटमध्ये स्थान मिळवलं. पुढची वीस वर्षं हे स्थान अबाधित राहिलं. यातल्या पाचदा रेस्टॉरंट अव्वल क्रमांकावर होतं. रेस्टॉरंटने शेवटचा अव्वल क्रमांक पटकावला तो 2021 मध्ये.

नोमा बंद का होतंय?

रिनी रेडझेपी हे जगातले प्रसिद्ध शेफ आहेत. आणि नोमा नंतर त्यांनी आपले बर्गर बार, पोपल असे फूड ब्रँडही सुरू केले आहेत. आणि कोव्हिड काळात सुरू केलेल्या या ब्रँडनीही कमी काळात लोकप्रियता मिळवली आहे. आता नोमा बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतलाय. हिवाळ्याचा हंगाम त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे 2024 चा हिवाळा सेलिब्रेट करून नोमा निरोप घेणार आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या एका अहवालानुसार, 2021 मध्ये नोमाला तोटा झाला होता. आणि तोट्याचं त्यांचं हे पहिलंच वर्षं होतं. त्यानंतर नोमाची संकल्पना बदलण्याचा विचार संस्थापक मालकांनी केला असावा.

‘नोमा 3.0 ची वेळ झालीय. आणि नवीन नोमा रेस्टॉरंट नॉरमॅडिक रेसिपींचा नवा अविष्कार असेल. कोपनहेगन बरोबरच जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आपला मानस आहे,’ असं रेडझिपी यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. त्यामुळे अनिश्चित काळासाठी नोमा बंद होणार असलं तरी ते पुन्हा नव्या स्वरुपात सुरू होण्यासाठीच एवढं नक्की.

नोमाची इंटरनेटवर का होतेय चर्चा?

खासकरून मांसाहार करणाऱ्यांसाठी नोमा हा एक अनुभव होता असं तिथं जाऊन आलेले लोक सांगतात. ट्विटरवर तशाच प्रकारच्या भावना व्यक्त होत आहेत. आणि असा संदेश लिहिणाऱ्यांमध्ये भारतीयही मागे नाहीएत.

गंमत म्हणजे नोमाचे संस्थापक रेडझेपी यांनी अलीकडे wild food नावाचं एक अॅप काढलं आहे. आणि यात आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या जंगली पदार्थांपासून खाद्यपदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन ते करतात. हे अॅपही जगभर गाजत आहे.