आयकराशी संबधित किचकट कर कायदे, अर्जाचे नमुने, रिटर्न फायलिंगच्या डेडलाईन्स आणि इन्कम टॅक्सविषयचीचे ताजे अपडेट आता एका क्लिकवर समजणार आहेत. आयकर विभागाची सोप्या भाषेत माहिती देणारी नवीन वेबसाईट आज 26 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाली. नवीन पोर्टल युजर फ्रेंडली असून करदात्यांना सोप्या भाषेत करविषयक माहिती समजून घेता येईल, असा विश्वास आयकर विभागाने व्यक्त केला.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी आयकर विभागाच्या नव्या पोर्टलचा आज शुभारंभ केला. उदयपूरमधील चिंतन शिबीरात त्यांनी आयकर विभागाच्या नव्या स्वरुपातील अद्ययावत वेबसाईटचे अनावरण केले.
आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटचे डिझाईन हे मोबाईलवरही चांगल्या प्रकारे अनुभवता येईल, याची विशेष खबरदारी सरकारने घेतली आहे. यात नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कर कायदे, नियमावली, करविषयक विविध करार यांचे विस्तृत माहिती देणारे स्वतंत्र विभाग या वेबसाईटवर आहेत. या वेबपोर्टलवर ईमेल विषयक मजकूर प्रिंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे टॅक्स प्रोफेशनल्ससाठी नवे वेबपोर्टल फायदेशीर ठरणार आहे.
नव्या वेबसाईटवर टॅक्स फॉर्म शोधणे आता आणखी सोपे झाले आहे. ज्यामुळे टॅक्स प्रोफेशनल्स आणि करदात्यांना फायदा होईल. याशिवाय रिटर्न फायलिंगची अंतिम मुदत दर्शवणारे सेक्शन होमपेजवर ठेवण्यात आले आहे. ज्यात वेगवेगळ्या रिटर्न्सची डेडलाईन ठळकपणे दाखवण्यात आली आहे.
ITR फायलिंगसाठी जुनीच वेबसाईट
इन्कम टॅक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न ऑनलाईन फाईल करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आयकर विभागाचे मूळ वेबपोर्टल कायम आहे. यावरुन टॅक्स रिटर्न, रिफंड, पॅन आधार लिंकिंग, पॅन व्हेरिफिकेशन, सारख्या सुविधा मिळतील.