थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठीच्या नव्या बेस प्रीमियम दराबाबत (New base premium rates) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं माहिती दिली. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मोटर थर्ड पार्टी प्रीमियम आणि देयता नियमांचा मसुदा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India) यांच्याशी सल्लामसलत करून तयार केला आहे. यात शैक्षणिक संस्थांच्या बसेससाठी 15 टक्के सवलत प्रस्तावित करण्यात आल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
वेगवेगळ्या कार आणि त्यांचे दर
या अधिसूचनेनुसार, थर्ड पार्टीला होणारं नुकसान कव्हर करणाऱ्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा मूळ प्रीमियम दर 1,000 सीसीपेक्षा कमी असलेल्या खासगी कारसाठी 2,094 रुपये असणार आहे. 1000-1500 सीसीच्या दरम्यानच्या कारसाठी 3,416 रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचबरोबर 1500 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी 7,897 रुपये इतका दर ठेवण्यात आला आहे.
दुचाकी अन् तीन चाकी वाहनांसाठीचे दर
याच अधिसूचनेनुसार, 75 सीसीपर्यंतच्या दुचाकींसाठी 538 रुपये प्रीमियम दर प्रस्तावित करण्यात आला आहे. 350 सीसी आणि त्यावरच्या दुचाकींसाठी714 ते 2,804 रुपयांच्या दरम्यान प्रस्तावित दर असेल. 7,500 किलोपेक्षा कमी वजनाच्या मालवाहतूक व्यावसायिक वाहनांसाठी (तीन चाकी वाहनांव्यतिरिक्त) प्रस्तावित दर 16,049 रुपये आहे, तर 40,000 किलो आणि त्याहून अधिक वजनाच्या वाहनांसाठी प्रस्तावित दर 27,186 ते 44,242 रुपयांदरम्यान असणार आहे.
तीनचाकी, पेडल सायकल मालवाहतूक वाहनं
ई-कार्ट व्यतिरिक्त, तीनचाकी आणि पेडल सायकल मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी 4,492 रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे. 30 किलोवॅटपर्यंतच्या खासगी ई-कारसाठी 1,780 रुपये प्रस्तावित आहेत. 30 ते 65 किलोवॅट क्षमतेच्या कारसाठी 2,904 रुपये आणि 65 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी 6,712 रुपये नवा प्रस्तावित दर असणार आहे. हा दर तीन किलोवॅटपर्यंतच्या ई-टू-व्हीलरसाठी 457 रुपये, तीन ते सात किलोवॅटसाठी 607 रुपये, सात ते 16 किलोवॅटसाठी 1,161 रुपये तसंच 16 किलोवॅट आणि त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी 2,383 रुपये असणार आहे.
15 टक्क्यांपर्यंत सूटही मिळणार
या अधिसूचनेनुसार काही वाहनांना यातून सूट दिली जाणार आहे. तीनचाकी वगळता 7,500 किलोपर्यंतच्या मालाची वाहतूक करणार्या बॅटरीवर चालणाऱ्या व्यावसायिक वाहनांसाठी प्रस्तावित दर 13,642 रुपये, 7,500-12,000 किलोसाठी 23,108 रुपये, 12,000-20,000 किलोग्रॅमसाठी 30,016 रुपये, 20,000-40,000 किलोग्रॅमसाठी 37,357 जास्त रुपये तर 40,000 किलो आणि त्याहून जास्त असलेल्या वाहनांसाठी 37,606 रुपये दर असणार आहे.
शैक्षणिक बसेस आणि इतर वाहनं
शैक्षणिक संस्थांच्या बसेससाठी यात 15 टक्क्यांची सूट असणार आहे. व्हिंटेज कार म्हणून नोंदणी असलेल्या खासगी गाड्यांना 50 टक्के, इलेक्ट्रिक वाहनं आणि हायब्रीड वाहनांसाठी अनुक्रमे 15 टक्के आणि 7.5 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव आहे.