देशाच्या प्रत्यक्ष कर (Direct Tax) संकलनामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये (2023-24) 23.51 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनामधून 8,65,117 कोटी रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 23.51 टक्क्यांनी वाढले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे.
प्रत्यक्ष कर संकलनात वाढ
या संकलित करामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स, वैयक्तिक आयकर आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स यांचा समावेश आहे. त्यानुसार निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 4,16,217 कोटी रुपये कॉर्पोरेशन टॅक्स (CIT) आहे. तर 4,47,291 कोटी रुपयांच्या वैयक्तिक इनकम टॅक्ससह सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन ट्रॅक्सचाही समावेश आहे. आयकर विभागाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षामध्ये याच कालवधीत जमा झालेला प्रत्येक्ष कर हा 7,00,416 कोटी रुपये होता.यानुसार यंदा प्रत्यक्ष कर संकलनात 23.51% ची वाढ दर्शवते.
अॅडव्हान्स टॅक्स संकलनामध्ये 20.73 % वाढ
तसेच सीबीडीटीच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत अॅडव्हान्स टॅक्स संकलनामध्ये 20.73 टक्क्यांनी वाढ झाली असून 3.55 लाख कोटी रुपये कर संकलन झाले आहे. मागील आर्थिक वर्षात हे संकलन 2.94 लाख कोटी रुपये इतके होते. या आर्थिक वर्षातील आतापर्यंतच्या एकूण अॅडव्हान्स टॅक्स संकलनातील 3.55 लाख कोटीमध्ये कार्पोरेशन टॅक्टसचा समावेश 2.80 लाख कोटी रुपये आणि पर्सनल टॅक्सचा समावेश 74,858 कोटी रुपये इतका आहे. तसेच सरकारने 16 सप्टेंबर 2023 पर्यंत या आर्थिक वर्षात करदात्यांना एकूण 1,21,944 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.