Contract Workers Layoff: जागतिक मंदीचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. मागील वर्षभरापासून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला आहे. त्यात आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही भर पडली आहे. 6% कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपला जॉब गमवावा लागला आहे. खर्च कमी करण्यासाठी आयटी कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.
3600 कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी
जानेवारी-मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत 3600 कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी नोकरीवरून काढून टाकले आहे. नुकतेच कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकालही जाहीर झाले. त्यात अनेक मोठ्या कंपन्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. नफा कमी झाल्याने कंपनीने खर्च कमी करण्यावर भर दिला. विप्रो, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस या कंपन्यांची कामगिरी सुमार दर्जाची राहिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येत असल्याचे इंडियन स्टाफिंग फेडरेशन या संघटनेने म्हटले आहे. या संघटनेमध्ये 120 रिक्रूटमेंट एजन्सीज आहेत. त्यांच्याद्वारे 60 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, सध्या कंपन्यांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच आहे त्या कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
पूर्णवेळ भरती थांबवून कंत्राटी भरतीला प्राधान्य
मार्च 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील आयटी क्षेत्रात सुमारे 50 लाख कर्मचारी काम करत आहेत. मात्र, अनेक कंपन्यांनी पूर्णवेळ कर्मचारी भरती थांबवून कंत्राटी भरतीला प्राधान्य दिले आहे. कारण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना फक्त गरज असेल तेवढ्याच काळापुरते कराराद्वारे कामावर ठेवता येत. अशा पद्धतीने कर्मचारी हायर करणे कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडते.
जागतिक स्तरावर देखील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचारी भरती रोडावली आहे. त्याचा परिणाम भारतातील रोजगारावर झाला आहे. दरम्यान, निर्मिती, वाहतूक आणि रिटेल क्षेत्रातील कर्मचारी भरती जोमात सुरू असून स्थानिक बाजारपेठ सुरळीत असल्याचे हे चिन्ह आहे.
कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी अतिरिक्त कर्मचारी भरती केली होती. अचानक सॉफ्टवेअर आणि संबंधित सेवांची मागणी वाढल्याने जास्त पगारावर कंपनीने कर्मचाऱ्यांना घेतले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पुन्हा खाली आले. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसह अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली.
भारताचा बेरोजगारी दर किती?
एप्रिल महिन्यात भारताचा बेरोजगारी दर 8.11 टक्क्यांवर गेला. त्याआधी म्हणजे मार्च महिन्यात हा दर 7.8% इतका होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संघटनेने बेरोजगारीची आकडेवारी दिली आहे.