Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NDTV Share Rally: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, NDTV चा महिनाभरात दुप्पट परतावा

NDTV

NDTV Share Rally: गौतम अदानी यांनी एनडीटीव्ही खरेदीसाठी ओपन ऑफर दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अदानी यांच्या प्रस्तावाला एनडीटीव्हीचे मुख्य प्रवर्तक प्रणव रॉय यांनी सेबीकडे आव्हान दिले आहे. दरम्यान या घडामोडींचे पडसाद NDTV च्या शेअरवर उमटले.

एनडीटीव्ही या राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनलच्या खरेदीसाठी गौतम अदानी यांनी प्रयत्न सुरु केले आहे. अदानी यांच्या ओपन ऑफरचा परिणाम NDTV च्या शेअरवर झाला आहे. सलग सातव्या सत्रात  NDTV च्या शेअरला अप्पर सर्किट लागले. आज शुक्रवारी 2 सप्टेंबर 2022 रोजी NDTV चा शेअर 5% तेजीसह 515.10 रुपयांच्या रेकॉर्ड पातळीवर गेला. एनडीटीव्हीवरुन प्रणव रॉय आणि गौतम अदानी एकमेकांसमोर उभे ठाकले असताना शेअर गुंतवणूकदारांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे.

आशियातील श्रीमंत उद्योजकांमध्ये आघाडीवर असणाऱ्या गौतम अदानी यांनी माध्यम क्षेत्रातील विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनडीटीव्ही या कंपनीवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.अदानी समूहाने थेट विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडवर ताबा मिळवला आहे.विश्वप्रधान कमर्शिअलचा एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे.त्यामुळे अप्रत्यक्षपणे आता त्यावर अदानी समूहाची मालकी निर्माण झाली आहे.  

अदानी समूहाने एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे. यावर आक्षेप घेत एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी सेबीकडे धाव घेतली आहे.कोणतीही चर्चा न करता हा एकतर्फी व्यवहार करण्यात आल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे.रॉय यांनी सेबीला तक्रार केली आहे.रॉय दाम्पत्याची एनडीटीव्हीमध्ये 32.26% हिस्सेदारी आहे.

NDTV Share Price Aug 2022
अदानी समूहाच्या ओपन ऑफरबाबतच्या वृत्तानंतर मात्र एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजीचा सिलसिला सुरु झाला आहे. सलग सात सत्रांमध्ये  NDTV च्या शेअरला अप्पर सर्किट लागले. आज तो 515.10 रुपयांवर गेला. गुरुवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी NDTV चा शेअर 490.60 रुपयांवर बंद झाला होता. आकडेवारीचा विचार केला तर मागील महिनाभरात NDTV चा शेअर 575% वधारला आहे. वार्षिक आधारावर एका वर्षात या शेअरने 350% रिटर्न दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. शेअरला दररोज अप्पर सर्किट लागत असल्याने ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांनी होल्ड केले आहेत. त्यामुळे NDTV चा शेअर खरेदी करता येत नाही.

ओपन ऑफर 17 ऑक्टोबरला खुली होणार 

अदानी समूहाने एनडीटीव्हीतला आणखी 26% हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रती शेअर 294 रुपयांची ओपन ऑफर जाहीर केली आहे. येत्या 17 ऑक्टोबर रोजी अदानी समूहाकडून ही ओपन ऑफर लॉंच केली जाईल. 1 नोव्हेंबर 2022 रोजी ही ऑफर बंद होईल. ही ऑफर पूर्ण सबस्क्राईब झाली तर अदानी समूहासाठी शेअर खरेदीचे एकूण मूल्य 492.81 कोटी इतके असेल. ओपन ऑफरमधून NDTV चे 1.67 कोटी शेअर खरेदी करण्याचे अदानी समूहाचे टार्गेट आहे. ही ओपन ऑफर जे.एम फायनान्शिअल या ब्रोकरेज कंपनीकडून हाताळली जाणार आहे.