अदानी समूहाने NDTV वर ताबा मिळवण्यासाठी ओपन ऑफर जारी केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये NDTV (New Delhi Television Ltd.) शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. चालू आठवड्यात एनडीटीव्हीचा शेअर अप्पर सर्किटमध्ये राहिला. सहा सत्रात हा शेअर 30% वधारला असून त्याने 450 रुपयांची पातळी ओलांडली होती. 2022 या वर्षात एनडीटीव्ही मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. हा शेअर तब्बल 300% ने वाढला आहे.
अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील 26% खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. या ओपन ऑफरमध्ये अदानी समूह एनडीटीव्हीचा शेअर 294 रुपयांनी खरेदी करणार आहे. 22 नोव्हेंबर 2022 पासून ही ओपन ऑफर खुली झाली असून सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी बंद होणार आहे. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार ओपन ऑफर 0.32 पटीने सबस्क्राईब झाली आहे.
जुलै महिन्यापासून NDTV चा शेअर तेजीत आहे. अदानी समूहाने पहिल्यांदा जुलै महिन्यात NDTV ताब्यात घेणार असल्याचे जाहीर केले होते. अदानी समूहाकडून याबाबत सेबीला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अदानी समूहाच्या 26% हिस्सा खरेदीला सेबीने मंजुरी दिली होती. त्यानंतर एनडीटीव्हीचा शेअर प्रचंड वधारला. सहा दिवसांत एनडीटीव्हीचा शेअर 30% वधारला. काल शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी शेअरमध्ये नफावसुली दिसून आली. दिवसअखेर तो 414.40 वर बंद झाला.
सप्टेंबर महिन्यात शेअरने ओलांडला होता 500 रुपयांचा टप्पा
सप्टेंबरमधील बहुतांश सत्रांमध्ये NDTV चा शेअर अप्पर सर्किटमध्ये होता. त्याने 515 रुपयांपर्यंत मजल मारली होती. ऑगस्टमध्ये NDTV चा शेअर 575% वधारला होता. वार्षिक आधारावर एका वर्षात या शेअरने 300% रिटर्न दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. शेअरला दररोज अप्पर सर्किट लागत असल्याने ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांनी होल्ड केले आहेत. जानेवारी 2022 च्या सुरुवातीला या NDTV च्या शेअरची किंमत 86 रुपये होती.
संचालकांचा राजीनामा
विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड,एएमजी मिडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्राईसेस लिमिटेड या कंपन्यांनी मिळून ऑफर दिली आहे. या तीनही कंपन्या NDTV मधील 26% अतिरिक्त हिस्सा खरेदी करतील. विश्वप्रधान कमर्शिअलचा एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे. एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचा एनडीटीव्हीमध्ये 32.26% हिस्सा आहे. त्यांनी नुकताच RRPR Holdings या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर NDTV चा चेहरा असलेले प्रसिद्ध वृत्त निवेदक रविश कुमार यांनीही राजीनामा दिला आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)