भारतातील आघाडीच्या वृत्त वाहिन्यांपैकी एक असलेल्या न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (एनडीटीव्ही) चे संपूर्ण मालकी हक्क उद्योजक गौतम अदानी यांना प्राप्त झाले आहेत. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी त्यांच्याजवळील 27.26% हिश्शाची विक्री केल्याची घोषणा केली.
प्रवण रॉय आणि राधिका रॉय यांच्याजवळ एनडीटीव्हीचे 32.26% शेअर्स होते. त्यापैकी 27.26 % शेअर सामंजस्याने एएमजी मिडिया नेटवर्क या कंपनीला विक्री केलेल्या रॉय दाम्पत्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे अदानी ग्रुपच्या एएमजी मिडियाची एनडीटीव्हीमध्ये जवळपास 65% हिस्सेदारी झाली आहे.
अदानी समूहाने गेल्याच महिन्यात एनडीटीव्हीतील शेअर्ससाठी ओपन ऑफर जाहीर केली होती. ओपन ऑफरमधून अदानी समूहाने एनडीटीव्हीचे 8.27% शेअर खरेदी केले होते. रॉय दाम्पत्याच्या हिस्सा विक्रीनंतर एनडीटीव्हीमध्ये अदानी समूहाचा आता 64.71% हिस्सा झाला आहे. यात विश्वप्रधान कमर्शिअलचा 8.27% आणि आरआरपीआर होल्डिंग्जचा 56.4% हिस्सा आहे. प्रणव रॉय 2.5% आणि राधिका रॉय यांच्याकडे 2.5%हिस्सा आहे.
अदानी समूहाने एनडीटीव्हीतील हिस्सा खरेदीसाठी जवळपास 648 कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील 60 दिवसांत एनडीटीव्हीचा शेअर सरासरीपेक्षा जास्त दराने ट्रेड करत होता. एनडीटीव्हीची सरासरी प्रती शेअर 368.43 रुपये इतकी होती. 1998 मध्ये एनडीटीव्हीचे प्रसारण सुरु झाले होते. वृत्तवाहिन्यांमध्ये आशियातील सर्वांत विश्वासार्ह वृत्तवाहिनी म्हणून एनडीटीव्हीची ओळख होती.