माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'एशियन इकॉनॉमिक डायलॉग' या परिषदेत मूर्ती बोलत होते. मागील काही महिन्यांपासून आयटी कंपन्यांमध्ये मूनलाईटिंगचा विषय चर्चेत आहे. अनेक कंपन्यांनी मूनलाईटिंग रोखण्यासाठी कठोर धोरण केले आहे. मूनलाईटिंगबाबत आज नारायण मूर्ती यांनी जाहीर भाष्य केले. ते म्हणाले कि तरुण कर्मचाऱ्यांनी मूनलाईटिंगच्या फसव्या जाळ्यात अडकू नये. घरुन काम करणे, ऑफिसला आठवड्यातून तीनदा येणे अशी कारणे देऊ नका. त्याऐवजी कार्यालयात नियमित जा असा सल्ला मूर्ती यांनी दिला.
मूनलाईटिंग विरोधात इन्फोसिसने पहिल्यांदा कठोर भूमिका घेतली होती. कंपनीच्या पेरोलवर असताना व्यवस्थापनाला अंधारात ठेवून दुसरेही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काही महिन्यांपूर्वी हकालपट्टी केली होती. मात्र आता इन्फोसिसने यासंदर्भातील भूमिका सौम्य केली आहे.
मूर्ती पुढे म्हणाले की भारतात प्रामाणिक संस्कृतीची आवश्यकता असून जिथे पक्षपाताला थारा नसेल. त्याशिवाय समृद्ध होण्यासाठी तातडीने निर्णय घेणारे नेतृत्व गरजेचे आहे, असे मूर्ती यांनी यावेळी सांगितले. झटपट निर्णय, तात्काळ अंमलबजावणी, अडथळेमुक्त व्यवहार, व्यवहारांमध्ये इमानदारी आणि पक्षपातपणा नसावा, असे ते म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक प्रचंड मेहनत करत आहेत. ते कामाच्याबाबत प्रामाणिक असून तत्वनिष्ठ आणि शिस्तीला पक्के असल्याचे त्यांनी सांगितले. मूर्ती यांनी चीनचे उदाहरण यावेळी दिले. 1940 मध्ये भारत आणि चीन यांची अर्थव्यवस्था जवळपास सारखीच होती. मात्र त्यानंतर चीन आपल्यापेक्षा सहापटीने वाढला. याचे कारण तेथील कामाची संस्कृती असल्याचे मूर्ती यांनी नमूद केले.
मूर्ती यांनी चीनमध्ये कशी झटपट कामाची पद्धत आहे याचा एक अनुभव देखील सांगितला. 2006 मधये शांघाईमध्ये इन्फोसिसचे नवीन कार्यालय सुरु करायचे होते. त्यावेळी शांघाईच्या महापौरांनी अवघ्या एका दिवसांत 25 एकर जागा मंजूर केली होती. भारतात मात्र याबाबत अद्याप बरीच सुधारणा आवश्यक आहे. खालच्या स्तरावरील यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. जर भारतातच उद्योग धंदे राहायला हवेत असे आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यासाठी सर्वतोपरी काम करणे आवश्यक आहे. उद्योगांना तातडीने निर्णय घेणे, त्याची झटपट अंमलबजावणी हवी. त्यात कोणत्याही प्रकारे वेळखाऊ पणा नको, असे त्यांनी सांगितले.
इन्फोसिसने मूनलाईटिंगसंदर्भातील भूमिका सौम्य केली
ज्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न कमवायचे आहे अशांसाठी कंपनीने धोरणात बदल केला आहे. ज्यांना अतिरिक्त उत्पन्न कमवायचे असेल त्यांनी कंपनीची आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पार्टटाईम करण्याची इच्छा आहे अशा कर्मचाऱ्याने त्याच्या मॅनेजर आणि एचआर कडून परवानगी घेणे आवश्यक आहे. हे सर्व अतिरिक्त काम त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत वेळेत करणे आवश्यक असून इन्फोसिसचे प्रतिस्पर्धी कंपन्यांचे किंवा इन्फोसिसच्या ग्राहक कंपन्यांशी संबधित काम नसावे, असे स्पष्ट धोरण कंपनीने लागू केले आहे.