Subhash Runwal: सुभाष रुनवाल हे रिअल इस्टेट व्यवसायातील एक आघाडीचं नाव. मुंबई शहरात त्यांनी बांधकाम व्यवसायातून साम्राज्य उभं केलं आहे. रुनवाल ग्रूपची स्थापना 1978 साली झाली. मागील अनेक वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगर भागात रुनवाल ग्रूपने मध्यमवर्गीयांचं घराचे स्वप्न पूर्ण केलं आहे. महाराष्ट्रातील धुळे या छोट्या शहरातून 40 च्या दशकात मुंबईत येऊन सुभाष रुनवाल यांनी यश मिळवले. या लेखात पाहूया सुभाष रुनवाल यांचा उद्योजकतेचा प्रवास.
पुण्यातून कॉमर्सचे शिक्षण घेतले
सुभाष रुनवाल यांचे कुटुंब हे महाराष्ट्रातील धुळे येथील आहे. रुनवाल कुटुंबीय जैन धर्मीय असून त्यांचे आजोबा सराफा व्यावसायिक होते. सुभाष रुनावाल कशोरवयात असताना त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. सुभाष यांना पाच भावंडे होती. आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने त्यांनी धुळे सोडून पुण्यात वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. त्यांना कॉमर्स विषयात आवड असल्याने त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
शंभर रुपये खिशात घेऊन धरली होती मुंबईची वाट
कॉमर्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1964 साली मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त 100 रुपये होते. तसेच त्यांचं वय अवघे 21 वर्ष होते. 1967 साली त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली. त्यांना Ernst & Ernst या कंपनीत नोकरी लागली. अमेरिकेतील मिसुरी येथे त्यांनी आपला तळ हलवला. मात्र, सहा महिन्यातच त्यांनी माघारी भारतात येण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन जीवनशैली आवडली नसल्याचे ते सांगतात.
केमिकल कंपनीतील नोकरीतून नाव कमावले
भारतात येऊन त्यांनी मुंबईत एका केमिकल कंपनीत नोकरी सुरू केली. उत्तम मराठी येत असल्याने त्यांनी सरकारी अधिकारी आणि राजकीय व्यक्तींसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. ते ज्या कंपनीत काम करत होते ते केमिकल सरकारने आयत करू नये यासाठी त्यांनी लॉबिंगही केली. यात त्यांना यशही आले. यासाठी त्यांनी तब्बल 52 वेळी दिल्लीवारी केली. केमिकल आयात सरकारने बंदी घातल्यावर त्यांच्या कंपनीने प्रगती केली. त्यातून त्यांचा पैसे मिळाले सोबतच नावही झाले.
रिअल इस्टेट व्यवसायास सुरुवात
अधिकारी आणि राजकीय वर्तुळात चांगली ओळख असल्याने त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. लँड सिलिंग अॅक्ट 1976 कायद्यातील पळवाटांचा त्यांनी बारकाइने अभ्यास केला. यातून त्यांनी ठाण्यात 22 एकर जागेचा प्लॉट घेतला. या व्यवसायात त्यांना फायदा झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गृहनिर्माण सोसायट्यांसोबतच त्यांनी रिटेल बांधकाम व्यवसायातही उडी घेतली. घाटकोपर येथील आर सिटी मॉल रुनवाल ग्रूपच्या मालकीचा आहे. रुनवाल ग्रूपने मुंबईच्या बाहेर अनेक जागा विकत घेऊन ठेवल्या आहेत. यासोबतच अनेक मॉल्स आणि रिटेल प्रॉपर्टी त्यांच्या ग्रूपकडे आहेत.
फोर्ब्ज इंडिया मासिकातील आकडेवारीनुसार सुभाष रुनवाल यांची संपत्ती 140 कोटी डॉलर्स इतकी आहे. सुभाष रुनवाल यांच्या पत्नीचे नाव चंदा असून संदीप, सुबोध आणि संगीता ही मुले आहेत. त्यांची दोन्हीही मुले रिअल इस्टेट व्यवसायात आहेत.