मुंबईकरांना वाहतुक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. मुंबईतील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसऱ्या टप्पा नागरिकांसाठी खुला होणार आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह हा मार्ग आजपासून (11 जून) नागरिकांसाठी प्रवासासाठी खुला होणार आहे. दुसरा टप्पाही प्रवाशांसाठी खुला झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला
मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मार्च महिन्यात उद्घाटन झाले होते. त्यावेळी केवळ दक्षिणेकडील भाग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मरीन ड्राइव्ह ते वरळी हा मार्ग प्रवासासाठी खुला होईल. उत्तरेकडील भाग प्रवासासाठी खुला झाल्याने नागरिकांच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल.
दुसरा मार्ग खुला झाल्याने मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचे अंतर केवळ 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. मात्र, काही दिवस हा मार्ग सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल. तसेच, केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्येच या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. रात्रीच्यावेळी मार्गाचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल. सध्या 90 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर टप्याटप्प्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल.
सध्या दक्षिणेकडील मार्गावरील 8 किमीचा पट्टा वाहतुकीसाठी खुला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उत्तरेकडील 6.25 किमी लांबीच्या पटट्यावर वाहतूक सुरू होईल.
काय आहे कोस्टल रोड प्रोजेक्ट?
कोस्टल रोड हा मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून सर्वात महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट समजला जातो. मार्चमध्ये या मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. 29 किमी लांबीच्या या प्रोजेक्टचा खर्च जवळपास 13 हजार कोटी रुपये आहे. या रोडच्या माध्यमातून मुंबईतील दक्षिण-उत्तर दिशेला जोडण्यात येणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचे अंतर अवघ्या 9 मिनिटात पूर्ण करता येईल.
या मार्गावर हाजी अली, ब्रीच कँडी, अमर्सन्स गार्डन, वरळी या ठिकाणी इंटरचेंजस देखील आहे. संपूर्ण मार्ग 8 पदरी असून, काही ठिकाणी बोगदा व पुलावरून हा रस्ता जाणार आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना कसा होईल फायदा?
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या मार्गामुळे वाहतुक कोडींपासून सुटका होण्यास नागरिकांना मदत होईल. मार्गावर ताशी 80 किमी वेगाने वाहन चालवता येईल. तर बोगद्यात हा वेग ताशी 60 किमी असेल.
दोन्ही मार्ग खुले झाल्याने मुंबई व उपनगरातील नागरिकांना याचा फायदा होईल. नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत 70 टक्के बचत होईल. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणात देखील 34 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, प्रवासाचे अंतर कमी झाल्याने इंधनावर होणारा खर्चही वाचणार आहे. कोस्टल रोड-वांद्रे-वरळी सी लिंकमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.