:गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. शुक्रवारी दुपारपर्यंतही हीच स्थिती दिसत होती. मात्र महानगर टेलिफोन निगम लि. (MTNL) च्या शेअर्सच्या दरात (MTNL Share Price)वाढ होत होती. गेल्या आठवड्याभराचा आणि महिनाभराच्या कालावधीचा विचार केला तर या शेअर्सने चांगला रिटर्न (परतावा) दिला आहे. यामुळे MTNL च्या गुंतवणूकदारांना याचा चांगला फायदा झाला आहे.
कंपनीचे शेअर्स शुक्रवारी इंट्रा डे ट्रेडमध्ये दुपारपर्यंत पहिल्या काही तासात 27.30 ते 30.30 रुपये प्रति शेअर दरम्यान ट्रेडिंग होताना दिसून आले. गुरुवारच्या व्यवहार सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येतं होती. MTNL Share Price मात्र वाढताना दिसून आले. शुक्रवारी पहिल्या काही तासात हीच स्थिती दिसून येतं होती.आठवड्याभारत या शेअर्सने 21 टक्के तर महिनाभरात 40 टक्के इतका परतावा दिला आहे. MTNL Share Price चा 52 आठवड्यातील उच्चांक 40.85 तर नीच्चांक 16.65 इतका राहिला आहे.
दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात MTNL ही सरकारी मालकीची कंपनी आहे. याच्या शेअर्समध्ये इतकी तेजी येण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.
शेअर्समध्ये तेजीचे कारण
भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) मदत करण्यासाठी सरकारने मोठे पॅकेज मंजूर केले आहे. 1 लाख ६४ हजार कोटी रुपयांचे हें पॅकेज असणार आहे.
बुधवारी लोकसभेत यावर चर्चा झाली.प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली. या पॅकेजमुळे संचार निगमचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल, असे ते म्हणाले. बीएसएनएल स्वदेशी विकसित ४जी आणि ५जी तंत्रज्ञान लागू करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच सरकार भारत संचार निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएललाही प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बीएसएनएल-एमटीएनएलच्या विलीनीकरणाला याआधीच मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे पॅकेजच्या बातमीला MTNL च्या दृष्टीनेही महत्व आले.
कंपन्या तोट्यात, पुनरुज्जीवनाचा प्रयत्न
सरकारी मालकीच्या BSNL ने स्थापनेपासूनचं 57 हजार 671 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवलेले आहे. एमटीएनएलला मार्च २०२२ पर्यंत सुमारे 14,989 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. कर्मचारी खर्च, बाजारातील स्पर्धा आणि कर्जाचा बोजा ही या तोट्याची महत्त्वाचे कारणे असल्याची सरकारी माहिती आहे.
मात्र तोट्यात जात असलेल्या या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनाचा सरकारचा प्रयत्न आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी एक पुनरुज्जीवन योजनाही 2019 मध्ये मंजूर करण्यात आली. यामध्ये VRS, गॅरंटी बॉण्ड्स, प्रशासकीय कर्ज पुनर्गठन अशा प्रकारे कर्मचारी खर्च कपातीचा समावेश केलेला आहे. कॅपिटल इन्फ्युजनद्वारे ४जी सेवांसाठी स्पेक्ट्रमचे वाटप, कोर आणि नॉन-कोअर मालमत्तेचे मुद्रीकरण आणि बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणासाठी तत्वतः मान्यता यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)