MRF Share Price: MRF टायर कंपनीने आज (13 जून) भारतीय भांडवली बाजारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. भारतात पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सने 1 लाख किंमतीचा टप्पा ओलांडला. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर्स 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता. 1 लाखांचा टप्पा ओलांडणारी एमआरएफ भारतातील पहिलीची कंपनी ठरली. त्यामुळे भांडवली बाजारात आज MRF ची चर्चा सुरू आहे.
सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर 1.37 टक्क्यांनी वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकीवर पोहचला. मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता. 10 नंतर शेअर पुन्हा 1 लाखांच्या खाली आला. मात्र, 1 लाखाचा माइलस्टोन पार केला.
मे महिन्यात शेअरची किंमत 1 लाख होण्यास फक्त 66.50 रुपये कमी होते. ती कसर आज भरून निघाली. 1 लाख किंमतीचा टप्पा ओलांडण्याच्या आधीपासून एमआरएफ कंपनीचा शेअर भांडवली बाजारातील सर्वात महागडा शेअर होता.
सर्वात महागडे शेअर्स कोणते?
MRF हा महागड्या शेअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल Honeywell Automation कंपनीचा शेअर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज सकाळी 41,152 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. त्याखालोखाल Page Industries, श्री सिमेंट, 3M India, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश कंपनीचे शेअर्स आहेत.
एमआरएफ शेअर्स सर्वात महागडा असला तरी गुंतवणूकदार फक्त किंमत पाहून शेअर्स विकत घेत नाहीत. कंपनीचा प्राइज टू अर्निंग रेशो, प्राइज टू बूक व्हॅल्यू काय आहे याला जास्त महत्त्व दिले जाते. मागील 12 महिन्यांचा विचार करता MRF चा PE रेशो नफ्याच्या 55.2 पट जास्त आहे. त्यामुळे शेअर्सचे मूल्य आणि कंपनीचे मूल्य यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा गोंधळ उडतो.
शेअरची विभागणी अद्यापही नाही
एमआरएफने अद्यापही आपल्या शेअर्सचे तुकडे पाडले नाहीत. त्यास स्टॉक स्प्लिट असे म्हणतात. स्टॉक स्प्लिट केल्यास शेअरचे मूल्य खाली येऊ शकते. भांडवली बाजारात एमआरएफचे 42,41,143 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी 72.16% शेअर्स गुंतवणूकदारांकडे आहेत. तर कंपनीच्या प्रमोटर्सकडे 11,80,831 म्हणजेच 27.84% शेअर्स आहेत.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे एमआरएफचे शेअर्स किती?
सर्वात महागडा शेअर्स असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे MRF चे शेअर्स कमी आहेत. MRF मध्ये 2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या फक्त 12.73% आहे. म्हणजे या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे फक्त 2 शेअर्स आहेत. फक्त 40 हजार छोट्या गुंतवणूकदारांकडे MRF चे शेअर्स आहेत.