शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 8 मे 2023 रोजी एमआरएफचा शेअर 1 लाख रुपयांच्या नजीक पोहोचला. वाहनांचे टायर बनवणारा एमआरएफ हा शेअर मार्केटमधील सर्वात महागडा शेअर म्हणून ओळखला जातो.आज सकाळच्या सत्रात 'MRF' च्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. 'MRF' 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडणार अशी शक्यता असताना त्यात नफावसुली दिसून आली. तो जवळपास 1% ने घसरला असून 98000 खाली आला आहे.
मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात 'MRF'चा शेअरने आज सोमवारी इंट्राडेमध्ये 99933 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडण्यासाठी केवळ 67 रुपये कमी पडले. याच वेळी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 200 अंकांची वाढ झाली होती.'MRF'चा शेअर सध्या 97582 रुपयांवर आहे. त्यात 1005 रुपयांची घसरण झाली. दुपारी 3.20 मिनटांनी तो 1.02% च्या घसरणीसह ट्रेड करत होता.
अमेरिकेत टायर निर्यात करणारी एकमेव भारतीय कंपनी असलेल्या 'MRF' ने मागील अनेक वर्षांत गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण परतावा दिला आहे. चेन्नईत मुख्यालय असलेल्या 'MRF'कडून टायर, ट्रेड, ट्युब, कन्वेअर बेल्ट, पेंट आणि खेळणी अशी विविध उत्पादने तयार करते. वाहन उद्यागोतील सर्वात मजबूत श्रेणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या AAA ग्रेड टायरची निर्मिती 'MRF'कडून केली जाते. 1952 मध्ये केएम मामेन मप्पिलई यांनी 'MRF'ची स्थापना केली. कंपनी सुरुवातीच्या काळात रबराचे फुगे बनवत होती. पुढे वाहन उद्योगासाठी 'MRF'ने टायर उत्पादन हाती घेतले.
कॉर्पोरेट क्षेत्रात 'MRF' एक नावाजलेला ब्रॅंड म्हणून ओळखला. या ब्रॅंडचे सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टी वॉ, विराट कोहली, रोहीत शर्मा, गौतम गंभीर, संजू सॅमसन, शिखर धवन या क्रिकेटपटूंनी प्रतिनिधीत्व केले आहे. 'MRF'चे बाजार भांडवल 41418.58 कोटी इतके आहे. कंपनीकडे 31 मार्च 2023 अखेर 114.85 कोटींची रोख असून 1995.21 कोटींचे कर्ज आहे. मार्चअखेर 'MRF'चे 27.84% शेअर कंपनीच्या प्रवर्तकांकडे आहेत. 42.25% शेअर गुंतवणूकदारांकडे असून 18.05% शेअर परदेशी संस्थात्मक गुंतणूकदारांकडे आहेत. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे 11.66% हिस्सा आहे.
तिमाहीत नफा वाढला, प्रती शेअर 175 रुपयांचा डिव्हीडंड
'MRF' ने नुकताच चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. जानेवारी ते मार्च 2023 या काळात कंपनीला 313.5 कोटींचा नफा झाला. त्यात 86% वाढ झाली. गेल्या वर्षी यात तिमाहीत कंपनीला 168.5 कोटींचा नफा झाला होता. कंपनीला एकूण 5842 कोटींचा महसूल मिळाला. त्यात 10% वाढ झाली. इतर स्त्रोतातून कंपनीला 70 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.या दमदारी तिमाही निकालांचे पडसाद शेअरवर उमटले होते. गेल्या आठवड्यात 'MRF'चा शेअर 5% ने वधारला होता.
यंदा नफ्यात वाढ झाल्याने कंपनीने प्रती शेअर 175 रुपये डिव्हीडंड जाहीर केला आहे.