कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असल्यास काळानुरूप बदलणे गरजेचे असते. अन्यथा, इतरांच्या तुलनेत आपण मागे पडत जातो. करिअरच्याबाबतीत देखील हे लागू होते. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास नवीन बदल शिकून त्यावर काम करणे गरजेचे आहे. तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकू शकता.
आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे करिअरचा योग्य मार्ग निवडणे. त्यामुळे 21व्या शतकात जर करिअरमध्ये टिकून राहायचे असल्यास योग्य करिअर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता, कौशल्य शिकणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
सध्या संपूर्ण जग औद्योगिक क्रांतीला मागे टाकत तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे जात आहे. प्रत्येक क्षेत्रावर तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्स सारख्या क्षेत्रात करिअरच्या एकापेक्षा एक चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.
21व्या शतकात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी असतील? कोणत्या क्षेत्रात करिअरमध्ये पुढे जाण्याची सर्वाधिक संधी मिळू शकते? कोणत्या नोकरीमध्ये प्रसिद्धी व पैसा देखील मिळेल व यासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर अवलंबून राहणे योग्य आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
करिअर निवडताना या गोष्टी ठेवा लक्षात
तुमची आवड लक्षात घ्या | करिअरच्या दृष्टीने कोणत्याही क्षेत्राची निवड करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची आवड लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कदाचित इतर क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळेलही, मात्र जर ते काम करताना आनंद मिळत नसल्यास करिअरमध्ये पुढे जाण्याच्या शक्यता देखील कमी होतात. |
शैक्षणिक अभ्यास व कौशल्य | केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून कदाचित तुम्हाला चांगली नोकरी मिळेलही, परंतु त्यापुढे जाण्यासाठी कौशल्य अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय, भविष्यात ज्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी असतील, अशाच शैक्षणिक अभ्यासक्रमाची निवड करावी. तसेच, शिक्षण पूर्ण करताना नवनवीन कौशल्य शिकणे देखील गरजेचे आहे. |
भविष्यातील संधी | 21व्या शतकात तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात नोकरीच्या सर्वाधिक संधी असतील. याशिवाय, कॉन्टेंट क्रिएटर, जाहिरात क्षेत्र देखील नोकरीसाठी उत्तम समजले जाते. त्यामुळे करिअर निवडताना 21व्या शतकात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या असतील याचा अभ्यास करूनच निर्णय घ्या. |
पगार व प्रसिद्धी | अनेकांची तक्रार असते की तासंतास काम करूनही हवा तेवढा पगार मिळत नाही. त्यामुळे जेथे सर्वाधिक पगार मिळू शकतो, अशाच क्षेत्राची निवड करणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रात मिळणाऱ्या सरासरी पगाराची आधी माहिती घ्या. त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठीच्या संधी व कालावधीचा विचार करा. |
भविष्यातील ट्रेंड | काळानुरुप बदलले नाही तर प्रगती थांबते. त्यामुळे भविष्यातील नोकरीचे ट्रेंड ओळखून त्यावर आतापासूनच काम करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात नोकरीच्या सर्वाधिक संख्या असली तरीही सर्वांनाच संधी मिळेल असे नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाव्यतिरिक्त ई-कॉमर्स, बँकिंग सारख्या इतर क्षेत्रांचा देखील विचारा करावा. |
21व्या शतकात या क्षेत्रात असतील नोकरीच्या सर्वाधिक संधी
एआय आणि मशीन लर्निंग | आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असे सातत्याने म्हटले जाते. कॉम्प्युटरच्या निर्मितीनंतर देखील नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, याउलट नवीन तंत्रज्ञानामुळे करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. एआयचा वापर आज प्रत्येक क्षेत्रात केला जात आहे. मशीन लर्निंगसाठी संशोधन, डिझाइन व त्यात सातत्याने बदल करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रातील तज्ञ, इंजिनिअर्स, डेव्हलपर्ससह इतर नोकऱ्यांची मागणी देखील सर्वाधिक असेल. |
सायबर सिक्युरिटी | आज आपण प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ञांची मागणी देखील वाढली आहे. सायबर धोके वाढत असल्याने यामध्ये नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर याबाबतचे ज्ञान असल्यास आंतरराष्ट्रीय कंपन्या, सरकारी संस्था अशा ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. या क्षेत्रात सायबर सिक्युरिटी विश्लेषक, एथिकल हॅकर, सिक्युरिटी इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट सारख्या अनेक चांगल्या पगार असलेल्या नोकऱ्या आहेत. |
रोबोटिक्स | झपाट्याने वाढत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सध्या रोबोटिक्सला महत्त्व प्राप्त झाले आहे. जी अवजड कामे करणे मानवाला शक्य होत नाही अथवा जास्त वेळ लागतो, अशावेळी रोबोट्सची मदत घेतली जाते. रोबोटिक्सच्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहे. या कामासाठी तुम्हाला प्रोग्रामिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही रोबोटिक्स इंजिनिअर म्हणून काम करू शकता. रोबोटचे डिझाइन, टेस्टिंग आणि डेव्हलपिंगसह अनेक कामे इंजिनिअरला पार पाडावे लागते. याशिवाय, संशोधक आणि टेक्निशियन म्हणून देखील काम करण्याची संधी मिळेल. |
नॅनोटेक्नोलॉजी | नॅनोटेक्नोलॉजीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. नवीन शोध, संशोधनाची आवड असल्यास या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंग सायन्स आणि टेक्नोलॉजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पर्यावरण, उर्जा, शेती, वैद्यकीय क्षेत्रात नॅनोटेक्नोलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भविष्यातही या क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होते. त्यामुळे जर तुमची संशोधनवृत्ती असेल व काहीतरी हटके करायचे असल्यास या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम निवडू शकता. |
बँकिंग | बँकिंग हे अशा ठराविक क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यात सातत्याने नोकरीच्या चांगल्या संधी असतात. हे क्षेत्र एका ठराविक भागापुरते मर्यादित नाही. त्यामुळे जोपर्यंत जगात आर्थिक व्यवहार घडत आहेत, तोपर्यंत या क्षेत्रात नोकरीच्या संधी कायम राहतील. परंतु, या क्षेत्रात चांगले करिअर घडवण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात आर्थिक सल्लागारापासून ते अकाउंटिंगपर्यंत अनेक चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु, काळाप्रमाणेच या क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. डिजिटल चलन, ब्लॉकचेन टेक्नोलॉजीच्यामदतीने बँकिंग क्षेत्र देखील झपाट्याने बदल आहे. त्यामुळे अधिक चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी तुमच्याकडे इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम कौशल्य असणे देखील गरजेचे आहे. |
कॉन्टेंट क्रिएशन | स्मार्टफोन व इंटरनेटमुळे मागील दशकात कॉन्टेंट क्रिएशनचे हे करिअरसाठीचे एक वेगळे क्षेत्रच तयार झाले आहे. भविष्यातही या क्षेत्राची लोकप्रियता कायम राहिल. अनेकजण कॉन्टेंट क्रिएशनच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. परंतु, कॉन्टेंट क्रिएशन हे केवळ व्हीडिओपुरते मर्यादित नाही. तुम्ही ब्लॉगिंग, ग्राफिक्स, फोटोग्राफी, गेमिंग सारखे कॉन्टेंट देखील तयार करू शकता. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे व्हीडिओ एडिटिंग, एसईओ, वेब डेव्हलपमेंटचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात तुम्हाला पैशांसोबतच प्रसिद्धी देखील मिळेल. |
मार्केटिंग आणि जाहिरात | गेल्याकाही वर्षात मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात अनेक चांगल्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. तुमच्याकडे गोष्ट सांगण्याची कला व नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता असल्यास या क्षेत्रात चांगले करिअर करू शकता. या क्षेत्रात तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, इव्हेंट प्लॅनर, पीआर तज्ञ, ब्रँड मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. |
आरोग्य क्षेत्र | बँकिंगप्रमाणेच आरोग्य क्षेत्र देखील प्रचंड मोठे असून, यामध्ये तुम्हाला नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकते. अगदी डॉक्टरपासून ते फार्मासिस्टपर्यंत अनेक चांगल्या पदाच्या नोकऱ्या या क्षेत्रात उपलब्ध आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबरच आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी मनुष्यबळाची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे 21व्या शतकात या क्षेत्रामध्ये निश्चितच चांगले करिअर घडवण्याची संधी आहे. |
ऊर्जा क्षेत्र | सध्या जगभरात पर्यावरण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक देशाकडून पावले उचलली जात आहेत. यामुळेच रिन्यूएबल एनर्जीला गेल्याकाही वर्षात विशेष महत्त्व प्राप्त असून, या क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी देखील निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रातउत्पादन, विक्री, इंजिनिअरिंग, संशोधनाशी संबंधित काम करण्याची संधी मिळेल. |
अंतराळ क्षेत्र | सध्या अंतराळ क्षेत्राकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहाणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मात्र, पुढील 50 वर्षांचा विचार केल्यास या क्षेत्राचा प्रचंड मोठा विस्तार होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांपासून ते पायलटपर्यंत अनेक नोकरीच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अंतराळ पर्यटनाची लोकप्रियताही वाढत चालली आहे. याशिवाय, स्पेस एक्स, ब्लू ओरिजिन आणि अग्नीकूल सारख्या खासगी कंपन्या देखील या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्राचा नक्कीच विस्तार होईल. |
भारतात या क्षेत्रातील नोकरीच्या संधी
भारतात गेल्याकाही वर्षात शैक्षणिक धोरणात प्रचंड मोठे बदल झाले आहेत. आयआयटी आणि आयआयएम सारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात करिअरचे करायचे असल्यास भारतातही अनेक चांगल्या सुविधा व संधी उपलब्ध आहेत.
सरकारकडून देखील उच्चशिक्षण व संशोधनाशी संबंधित क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जात आहे. कौशल्यविकासासाठी प्रयत्न केले जात आहे. अधिकाधिक रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच, इतर क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी देखील भारतात भरपूर संधी उपलब्ध आहेत. Digital India आणि BharatNet च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारकडून उद्योजकतेला प्राधान्य दिले जात आहे. स्टार्टअप इंडिया आणि स्टँड-अप इंडियाच्या माध्यमातून तरूण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अंतराळ, आरोग्य व उर्जा क्षेत्रात नव्या संधीची दारे उघडली गेली आहेत. विशेष म्हणजे या क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्ये पगारही जास्त मिळतो.
शिक्षण व कौशल्य महत्त्वाचे
21व्या शतकाचा विचार करता प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा बोलबाला असेल हे निश्चित. त्यामुळे करिअरची निवड करत अशाच क्षेत्राचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही एका करिअरची निवड करून त्याच्याशी संबंधित शिक्षण घेऊ शकता. मात्र, संबंधित विषयाची फक्त पदवी असणे पुरेसे नाही.
महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. परंतु, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे नेतृत्व क्षमता, वैचारिक दृष्टीकोन आणि कौशल्य असणे देखील अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिकाधिक चांगल्या नोकरीपर्यंत पोहचू शकता.