Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: दैनंदिन आयुष्यातील छोट्या सवयी बदला होईल मोठी बचत; कशी, जाणून घ्या

Money Saving Tips

Image Source : www.sofi.com

Money Saving Tips: आपण दैनंदिन आयुष्यातील काही सवयी बदलल्या की, मोठी बचत करू शकतो. मात्र त्या सवयी एकट्याने नाही, तर संपूर्ण कुटुंबाने बदलायला हव्यात. कोणत्या आहेत त्या सवयी, जाणून घेऊयात.

घर चालवताना आपण अनेक छोटे मोठे खर्च करतो. बऱ्याच वेळा केलेले खर्च आपल्या लक्षात देखील राहत नाहीत. महिना अखेर ज्यावेळी खिसा रिकामा होतो, त्यावेळी आपण केलेले वायफळ खर्च लक्षात येतात. छोट्या गोष्टींवर केलेला खर्च कमी केला, तर मोठी बचत करता येते. ही बचत करायची असेल तर आपल्याला दैनंदिन आयुष्यातील काही सवयी बदलाव्या लागतील. ज्याचा फायदा आपल्याला महिन्याच्या शेवटी बजेट प्लॅनिंग (Budget Planning) करताना होऊ शकतो. 

या छोट्या सवयी किंवा छोटे खर्च हे केवळ कुटुंबातील एकाच व्यक्तीने करून काहीच उपयोग नाही. संपूर्ण कुटुंबाने मिळून या सवयीचा अवलंब केला, तर छोटे खर्च कमी करून मोठी बचत साध्य करता येईल. कोणत्या आहेत त्या सवयी, जाणून घेऊयात.

विनाकारण विजेचा वापर टाळा 

घरातील बहुतांश इलेक्ट्रिक व  इलेक्ट्रॉनिक (Electrical and Electronic) उपकरणे ही विजेवर चालतात. ज्याचे बिल आपण महिना संपाला की लगेच भरतो. बऱ्याच घरांमध्ये विनाकारण लाईट, फॅन चालू ठेवले जातात. गरज नसताना देखील ही उपकरणे चालू असतात. बाथरूममधील गीझर किंवा हिटर पाणी गरम झाल्यानंतर देखील चालू ठेवला जातो. साहजिकच त्यामुळे जास्त वीजबिल येते. वीजबिल जास्त म्हणजे खर्च जास्त हे समीकरण लक्षात ठेवा.

मोजक्या टीव्ही चॅनेल्सचा प्लॅन खरेदी करा

काही लोक ठराविक टीव्ही चॅनेल्सच दररोज पाहतात. उर्वरित चॅनेल्स पाहत नाहीत. मात्र टीव्हीचा रिचार्ज करताना ते संपूर्ण चॅनेल्स असणारा पॅक खरेदी करतात. डिश रिचार्ज किंवा केबल रिचार्ज करताना हल्ली निवडक चॅनेल्सचा रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टीव्ही रिचार्ज प्लॅन करू शकता. यामुळे तुमचे पैसे देखील वाचण्यासाठी मदत होईल.

खरेदीपूर्वी लिस्ट करायला शिका

महिन्याला आपण घरातील सामानाची खरेदी करतो. ही खरेदी करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची लिस्ट तयार करायला शिका. लिस्ट न बनवता खरेदी केली, तर उगाचच वायफळ खर्च होतो. बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त सामान खरेदी केल्याने महिन्याच्या बजेटच्या धक्का लागू शकतो.

कपड्यांना इस्त्री घरीच करा 

बहुतांश घरांमधील कपडे ही घरात इस्त्री असताना देखील दुकानात इस्त्रीसाठी दिली जातात. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा संपूर्ण कुटुंबाची कपडे इस्त्रीसाठी दुकानात दिली जातात. सध्या शर्ट आणि पॅन्टचा एक जोड इस्त्री करण्यासाठी 15 ते 20 रुपये खर्च सहज येतो. चार माणसांचे कुटुंब असेल, तर महिन्याला साधारण 1500 ते 2000 रुपये फक्त इस्त्री करण्यासाठी खर्च येतो. हा खर्च सवयीने टाळला जाऊ शकतो. आपल्याला गरजेची कपडे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा फेराफेराने इस्त्री करायला हवीत, जेणेकरून हा खर्च टाळता येऊ शकतो.

कॅशचा वापर वाढवा

सध्या आपल्याला कोणताही व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याची सवय लागली आहे. कोविड महामारीनंतर हे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना लोक UPI पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर  वापर करतात. त्यामुळे छोट्या मोठ्या खर्चासाठी सुद्धा गुगल पे (Google Pay) किंवा पेटीएम (Paytm) वापरले जाते. Online Transaction करताना आपल्याला खर्च लक्षात येत नाही. मात्र जर आपण कॅशने व्यवहार करत असू तर होणार खर्च आपल्या लगेच लक्षात येतो. ज्यामुळे वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.