काही सवयी या योग्य वयात लावल्या की, त्या अंगवळणी पडतात आणि त्याचा अवलंब आयुष्यभर केला जातो. म्हणूनच तर लहानपणी आई-वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतात आणि त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतात. पैशांची बचत करणे ही देखील एक सवय आहे, जी पालक आपल्या मुलांना लहान वयात शिकवू शकतात.या सवयीमुळे मुलांना पैशांचे महत्त्व कळते आणि पुढील आयुष्यात ते आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अधिक सक्षमपणे विचार करतील. शालेय वयात लावलेल्या सवयी या मुलांच्या अंगवळणी पडतात. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या आर्थिक बचतीच्या सवयी लावू शकता, जाणून घ्या.
Table of contents [Show]
गरज vs उपभोगाच्या गोष्टी
मुलांना बचतीचे मूल्य शिकवण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना गरज आणि उपभोगाची गोष्ट यातील फरक समजून सांगणे. गरजेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण येते. तर उपभोगाच्या गोष्टींमध्ये चित्रपटाची तिकिटे, सायकल, महागड्या वस्तू किंवा खेळणी, स्मार्टफोन इ. गोष्टी येतात. मुलांना भविष्यातील गरजांचे महत्त्व पटवून द्या आणि त्यांना कशावर खर्च करायला हवा हे समजून सांगा. उपभोगाच्या गोष्टींसाठी पालकांनी नाही म्हणायला शिका.
पैसे साठवायला सांगा
मुले लहान असतानाच त्यांना पैशांची बचत करायला सांगा. त्यासाठी त्यांना तुम्ही भिशी घेऊन द्या. त्यामध्ये तुम्ही त्यांना दररोज किंवा आठवड्यातून एकदा थोडे पैसे बचत स्वरूपात भिशीत टाकायला सांगा. यामुळे त्यांना बचतीची सवय लागेल आणि भिशीतील वाढते पैसे पाहून प्रोत्साहन मिळेल. याच साठलेल्या पैशातून त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट खरेदी करा. ज्यामुळे ते आणखी प्रोत्साहित होतील.
मुलांकडून खर्चाचा हिशोब घ्या
पालक मुलांना बऱ्याच कारणांनी पैसे देतात. ज्याचा हिशोब त्यांच्याकडून घ्यायला हवा. पालकांनी जर मुलांना खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मागितला, तर मुलांना आपण कुठे पैसे खर्च करतो, ते समजून येईल. बऱ्याच वेळा झालेला अतिरिक्त खर्च लक्षात येईल.या हिशोबातून मुलांना खर्चाची नोंद ठेवण्याची सवय लागेल. जी पुढील आयुष्यात मोठमोठे व्यवहार करताना उपयोगी पडेल.
बचतीची स्पर्धा करा
मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी त्यांना एका ठराविक आकड्याची बचत करायला सांगा. ही बचत निश्चित कालावधीत करण्याचे लक्ष त्यांना द्या. हे लक्ष मुलांनी साध्य केल्यावर त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी बक्षीस म्हणून द्या. यामुळे त्यांना बचतीची सवय लागेल.
मुलांना कष्टाने पैसे कमवायला सांगा
उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत मुलांना छोटी मोठी कामे करायला सांगा. हा त्यांचा सुट्टीच्या काळातील जॉबच असेल असे समजा. बागकाम करणे, भाजी आणणे, घरातील साफसफाई करणे यासारखी कामे त्यांना करायला सांगा आणि त्याबदल्यात त्यांना ठराविक रक्कम द्या. यामुळे त्यांना कष्टाने कमवलेल्या पैशांची किंमत कळेल. हा कमवलेला पैसा कधी, कुठे आणि कसा खर्च करायचा याबाबत मार्गदर्शन करा.