महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 'मिशन शक्ती' ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्जाची उपलब्धता इत्यादींना चालना देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचाही या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे. महिलासंबंधीत इतर अनेक योजनांचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे.
Table of contents [Show]
मिशन शक्तीच्या दोन उपयोजना
'संबळ' आणि 'सामर्थ्य' या मिशन शक्तीच्या दोन उपयोजना आहेत. या दोन्ही योजनांद्वारे महिलांचा विकास साधण्यात येणार आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 'मिशन शक्ती' योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारत सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीत अंमलबजावणीसाठी महिलांच्या सुरक्षितता, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी छत्र योजना म्हणून 'मिशन शक्ती' - एक एकीकृत महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला आहे.
संबल योजना
वन स्टॉप सेंटर (OSC)
पीडित, लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना सहकार्य करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये OSC ची स्थापना करण्यात येत आहे. येथे जाऊन पिडीत महिला मदत घेऊ शकतात. जास्त गुन्हे घडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त 300 OSC स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच मदतीसाठी 24 तास मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
नारी अदालत
महिलांसंबंधीत प्रश्न सोडविण्यासाठी नारी अदालतची याची स्थापना केली आहे. अनेक महिला रोजगारासाठी बाहेर पडतात. त्यांना खासगी किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करताना अत्याचार, हिंसा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रश्नांवर तोडगा शोधण्यासाठी नारी अदालत स्थापन करण्यता आली आहे. या याजनेतून महिलांना कायदेशीर मदतही पुरवली जाते.
'सामर्थ्य' योजना
या योजनेमध्ये उज्ज्वला, स्वाधार गृह आणि कामगार महिला वसतिगृहाच्या पूर्वीच्या योजनांचा समावेश आहे. ICDS अंतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश सामर्थ्य योजनेत करण्यात आला आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी निधी पुरवठा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या सेवा पुरविण्यात येणार
लैंगिक अत्याचार, तस्करी यामध्ये अडकलेल्या महिला आणि बालकांना कायदेशीर मदत, वैद्यकीय मदत, समुपदेशन, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील.