यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सून आल्याने अद्याप शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. दरम्यान, या खरीप हंगामात भरडधान्य (Millets) पिकांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (Millets crop Year) म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या पिकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पावसावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ही पिके आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहेत. त्यामुळे आज आपण भरड धान्याबाबतची अधिकची माहिती घेणार आहोत.
कमी पाण्याचे पीक आहे भरडधान्य-
भारतातील बहुताश शेती पिके हे मोसमी पावसावर अवबंलबून आहे. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाला प्राधान्य देण्याची गरज आहे. भारतात अनेक वर्षापासून भरडधान्य म्हणजेच बाजरी, राळा, नाचणी, वरई, वाण इत्यादी पिंकाचे उत्पादन घेतले जाते. ही भरडधान्ये पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. सध्या या पिकाच्या लागवडीखालील पिकाचे प्रमाण कमी आहे. मात्र, सध्या कृषी शास्त्रज्ञांनी नवनवीन वाणांची निर्मिती केल्याने या भरडधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. शिवाय हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे.ही पिके सहज वाढतात, हवामानास अनुकूल आणि दुष्काळ प्रतिरोधक असतात. त्यामुळे ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नक्कीच चालना देणारी ठरू शकतात.
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष -
संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी धोरणात्मक उपक्रम राबवून ही धान्ये शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यास कशी उपयुक्त ठरतील, याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात दिली होती. त्यामुळे भरड धान्यांशी निगडित ही जागतिक चळवळ या पिकास चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे.
जागतिक पातळीवरील भरड धान्याबाबत घेण्यात आलेली दखल आणि संतुलित पोषणाचे समृद्ध स्रोत असल्याने जागतिक स्तरावर ग्राहकांकडून वाढणारी मागणी याचा विचार केला असता शेतकऱ्यांनी या पिकांचे उत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार आहे. तसेच राळा, बाजरी, नाचणी, वरई या सारख्या भरड धान्यांना कमी पाणी लागत असल्याने आणि त्यांची शेती नैसर्गिक शेती पद्धतींशी सुसंगत असल्याने ती पिके घेणे शेतकरी आणि पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे.
भरडधान्याच्या पिका विषयीची थोडक्यात माहिती-
राळा (Foxtail Millet)
राळ्याचे कणीस झुपकेदार आणि कोल्ह्याच्या शेपटीसारखे अर्धगोलाकार दिसते त्यामुळे त्याला फॉक्सटेल (कोल्ह्याची शेपटी)मिलेट असे संबोधले जाते. राळा हे एकदल प्रकारातील पीक असून 70 ते 95 दिवसांत काढणीला येते. हेक्टरी 15 ते 18 क्विंटल याचे धान्य उत्पादन होते. जगभरातील एकूण पौष्टिक भरडधान्य उत्पादनात राळा पिकाचा दुसरा क्रमांक लागतो पिकाचा वाढीचा वेग जास्त असून हे पीक कमी दिवसात कापणीस येते. कमी पावसात हे पीक तग धरू शकते. महाराष्ट्रात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या पिकाची पेरणी केली जाते
बाजरी (Pearl millet)
कमी पाण्यावर तग धरून राहणारे पीक आणि खरीप हंगामातील एक मुख्य भरडधान्य म्हणून बाजरीचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बाजरी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. हेक्टरी सरासरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन निघते.
नाचणी (Finger Millet)
नाचणीच्या पिकाला इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट म्हणून ओळखले जाते.भारतासोबत आफ्रिका, मलेशिया, चीन व जपान आदी देशांमध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आदिवासी लोकांच्या अन्नामध्ये मुख्यत्वे नाचणीचा वापर होतो. हेक्टरी 10 क्विंटल उत्पादन निघते.
बर्टी (Barnyard Millet)
बर्टी या पिकाची धान्य आणि चारा या दुहेरी हेतूने लागवड केली जाते. याचे हेक्टरी सरासरी उत्पादन हे 7 क्विटल निघते. आरोग्यासाठी महत्त्व असल्याने याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.कोडो (Kodo Millet)
वरई (Little Millet)
वरईचा आकार लहान असतो. भारतातील पारंपरिक पिकांपैकी असलेल्या या पिकाचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वरईचे हेक्टरी उत्पादन हे सरासरी 12 ते 14 क्विंटल इतके निघते.