अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) नागरिकांसाठी उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म पत पुरवठा ही योजना (Micro finance scheme) राबविण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे उद्योग सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाते.
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
योजनेच्या प्रमुख अटी (Eligibility of Micro finance scheme) - अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावे.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.
- राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1 लाखापर्यंत आहे.
- जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा.
- अर्जदाराने महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व नियम अर्जदारावर बंधनकारक राहतील.
योजनेद्वारे मिळणारा लाभ - (benefits under micro finance scheme)
या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना 5% व्याजदराने 50 हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये 10 हजार अनुदान दिले जाते व उर्वरीत ४० हजार रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध आहे. अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.