मागच्या काही महिन्यांपासून नोकरकपातीचा ट्रेंड (Layoffs) मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुरू झालाय. आयटी, ई-कॉमर्ससह इतर आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहेत. अतिरिक्त पदं असल्याचं कारण यासाठी दिलं जातंय. कंपनीची नव्यानं घडी बसवायची असल्याचाही सूर या खासगी कंपन्यांचा असतो. आता सोशल मीडियातली आघाडीची कंपनी मेटानं (फेसबुक) भल्यामोठ्या नोकरकपातीची योजना आखलीय. आकडा जवळपास 10,000च्या आसपास असल्याचं दिसून येतंय. ही नोकरकपात विविध टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. अधिक कार्यक्षमता हे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचं उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी तसंच नव्यानं घडी बसवण्याच्या उद्देशानं ही कपात होत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नं याविषयीचं सविस्तर वृत्त दिलंय. एक मेमो आहे, यात मूळ कंपनी फेसबुकनं (Facebook) आपल्या मॅनेजर्सना नोकरकपात करण्याच्या सूचना दिल्याचं म्हटलंय.
मे महिन्यात आणखी एक फेरी
या नोकरकपातीचा फटका फेसबुक, व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम आणि रिअॅलिटी लॅब ज्यात व्हर्चुअल रिअॅलिटी एफर्ट्स, आणि क्वेस्ट हार्डवेअर आहेत, यातल्या सर्वांनाच बसणार आहे. खर्चात कपात करणं सध्या गरजेचं असल्याचं झुकरबर्ग यांचं म्हणणं आहे. त्याच अनुषंगानं ही कपात असणार आहे. यानुसार 10,000 कर्मचारी पदमुक्त होणार आहे. तर मे महिन्यात कपातीची आणखी एक फेरीदेखील सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
Facebook parent company Meta will announce details about new job cuts on Wednesday, part of a months-long downsizing and restructuring effort that will trim 10,000 employees amid multiple waves of layoffs.https://t.co/6DsiAxRkBe
— The Washington Post (@washingtonpost) April 19, 2023
आधीही काढले होते 11,000 कर्मचारी
ही काही मेटाची पहिली नोकरकपात नाही. याआधी नोव्हेंबरमध्ये सुमारे 13 टक्के कर्मचारी म्हणजे सरासरी 11,000 जणांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. तसंच पहिल्या तिमाहीत हायरिंग फ्रीझ वाढवला. कंपनीचा परफॉर्मनन्स, तंत्रज्ञान, अभियंते, व्यवसाय तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं गुणोत्तर संतुलित असणं हे सध्या महत्त्वाचं आहे, असं झुकरबर्ग यांनी कंपनी प्रशासनाला सांगितलं.
घरून काम करण्याच्या सूचना
कंपनीची पुनर्रचना करणं आणि राहिलेल्या इतर कर्मचाऱ्यांना नव्या व्यवस्थापकांखाली काम करण्याच्या सूचना देणं हेच या निर्णयावरून दिसून येतंय. या सर्व प्रक्रियेला काही वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरता उत्तर अमेरिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना मेटानं बुधवारी (19 एप्रिल) घरून काम करण्यास सांगितलंय. यासंबंधी अधिक काही बोलण्यास कंपनीच्या प्रवक्त्यानं नकार दिलाय. पुढच्या काळात कंपनीनं काही ध्येय ठेवलंय. त्याचाच हा एक भाग आहे, एवढंच सध्या कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.