तंत्रज्ञान क्षेत्रातील फेसबुकची प्रमुख कंपनी मेटामधील सर्वच कर्मचाऱ्यांची सध्या झोप उडाली आहे. मेटाने पुन्हा एकदा नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. खर्च कमी करण्यासाठी मेटाकडून हजारो कर्मचाऱ्यांची गच्छंती केली जाणार आहे.
मेटामधून नोव्हेंबर महिन्यात तब्बल 11000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले होते. खर्च कमी करणे आणि काटकसरीला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आता तीन महिन्यांनंतर मेटामध्ये नोकर कपातीचा आणखी एक राऊंड होणार असल्याचे वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मेटा ही फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपन्यांची पालक कंपनी आहे. सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांची आणि पदांची फेररचना सुरु केली आहे. यात एच.आर, कायदे विभाग, वित्तीय जाणकार आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मेटाने नोव्हेंबर 2022 मध्ये जगभरातील 11000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. मेटाच्या एकूण मनुष्यबळापैकी 13% कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यावेळी कंपनीने मंदी आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या असल्याची कारणे पुढे केली होती.
मेटावर ही वेळ का आली?
मेटा कंपनीच्या महसुलात प्रचंड घसरण झाली आहे. मेटाला वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत 32165 बिलियन डॉलरचा महसूल मिळाला. त्यात वर्ष 2021 च्या तुलनेत 4% घसरण झाली. नोकर कपात करुन देखील कंपनीच्या खर्चात मात्र 22% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मेटाचा खर्च 25766 बिलियन डॉलर इतका वाढला होता. वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत तो 21086 बिलियन डॉलर इतका होता. मेटाच्या निव्वळ नफ्यात तब्बल 55% घसरण झाली आहे. मेटाला 4652 बिलियन डॉलरचे नेट इन्कम मिळाले. 2021 मध्ये याच तिमाहीत 10285 कोटींचे नेट इन्कम मिळाले होते.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि नैराश्य
मागील तीन महिन्यात फेसबुक आणि मेटाने प्रचंड नोकर कपात केली आहे. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि नैराश्याचे वातावरण आहे. मॅकिन्सीने 2000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ट्विटरदेखील सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. वर्ष 2022 मध्ये ट्विटर खरेदी केल्यानंतर बिलेनिअर एलन मस्क यांनी 50% कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. कंत्राटी पद्धतीतील 4400 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला. भारतातील 90% कर्मचाऱ्यांना ट्विटरने नारळ दिला होता. अॅपल या स्मार्टफोन उत्पाद कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.
दोन महिन्यात 84400 कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
रशिया-युक्रेन युद्ध, युरोप आणि अमेरिकेत उसळलेला महागाईचा आगडोंब यामुळे जगभरात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बड्या कॉर्पोरेट्सचा आर्थिक डोलारा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खर्च आटोक्यात आणण्यासाठी वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत अनेक बड्या कंपन्यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला. ज्यात हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. मात्र त्याहून भीषण परिस्थिती 2023 मध्ये निर्माण झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जगभरातील 268 कंपन्यांनी 84400 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. कोव्हीड संकटकाळापेक्षा ही परिस्थिती भयंकर आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात 22800 कर्मचारी बेरोजगार झाले. झूम, गुगल, मायक्रोसॉफ्ट, लिंकडेन, एचपी, टिकटॉक, याहू, डेल यासारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचारी कमी करुन खर्चात काटकसर करण्याचा प्रयत्न केला.