रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर जैसे ठेवले होते.मात्र सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी कर्जाच्या दरात वाढ केली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांनी कर्जाचा व्याजदर 0.05% ने वाढवला आहे. यामुळे या दोन बँकांच्या कर्जदारांना मासिक हप्ता भरताना (EMI) जादा पैशांची तजवजी करावी लागणार आहे. या दोन्ही बँकांचे सुधारित व्याजदर 12 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
कॅनरा बँकेने 'एमसीएलआर'च्या दरात 0.05% वाढ केली आहे. त्यानुसार सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर 8.45% इतका वाढला आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.65% झाला आहे. व्याजदरात किंचित वाढ झाली असल्याने एमसीएलआरने ज्यांनी कर्ज घेतले आहे अशा कर्जदारांना मासिक हप्ता वाढणार आहे. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा EMI वाढणार आहे.
दरम्यान, बँकेने एक दिवसाचा, एक महिन्याचा आणि तीन महिन्यांचा एमसीएलआर दर स्थिर ठेवला आहे. कॅनरा बँकेच्या वेबसाईटनुसार एक दिवसाचा एमसीएलआर 7.90% इतका आहे. एक महिन्यासाठीचा एमसीएलआर 8.00% आणि तीन महिन्यांसाठीचा दर 8.15% इतका आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने कर्जदारांना झटका दिला आहे. बँक ऑफ बडोदाने मंगळवारी कर्जदरात 0.05% वाढ केली आहे. 12 एप्रिलपासून नवे व्याजदर लागू होतील, असे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर दर 8.60% झाला आहे. एक दिवसासाठीचा एमसीएलआर 7.95% इतका आहे. बँक ऑफ बडोदाचा एक महिन्याचा एमसीएलआर दर 8.20% इतका आहे. तीन महिन्यांचा दर 8.30% असून सहा महिन्यांचा दर 8.40 % इतका आहे.