घरात बाळ जन्माला येणे म्हणजे एक सोहळाच असतो. पण यावेळी जर आपली आर्थिक बचत कमी असेल तर बाळ येण्याचा आनंद आपण मनमोकळेपणाने साजरा नाही करू शकत. पण हेच जर तुम्ही कुटुंब नियोजनाचा विचार करून मातृत्व आरोग्य विमा (मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्स) घेतला असेल तर कोणत्याही तणावाशिवाय येणाऱ्या बाळाचे स्वागत करू शकाल.
मातृत्व विमा सामान्यत: आपल्या मुख्य आरोग्य विमा पॉलिसीसह अॅड-ऑन केला जातो. या विम्यात बाळाच्या बाळंतपणाच्या सिझेरियन आणि सामान्य या दोन्ही पद्धतींचा संबंधित खर्च कव्हर केला जातो. काही विमा कंपन्या प्रसूती विमा हा अतिरिक्त सेवा म्हणून ही देतात. प्रत्येक विमा कंपन्यांचे याबाबत वेगवेगळे नियम आहेत. साधारणत: मातृत्व आरोग्य विम्यावर 12 ते 15 हजार रुपयांचा प्रिमिअम आकारला जातो.
मातृत्व विम्याचे फायदे Benefits of Maternity Insurance
मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्समध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन असा दोन्हीचा खर्च समाविष्ट असतो. हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेण्याच्या तारखेच्या 30 दिवसांपूर्वीचा खर्च ही विम्यामार्फत कव्हर होतो. तसेच नर्सिंग चार्जेस, हॉस्पिटलमधील रूमचे भाडे, सर्जन, भूलतज्ज्ञ, सल्ला देणाऱ्या डॉक्टरांची फी, आरोग्य तपासणी अहवाल आणि गोळ्यांचा खर्च देखील विम्या अंतर्गत कव्हर केला जातो.
मातृत्व विमा योजना कधी घेऊ शकतो
साधारणत: बाळाला जन्म देण्याचा विचार पक्का झाल्यावर लगेचच मातृत्व विमा योजना काढावा. अगोदरच आरोग्य विमा असेल तर त्यात मातृत्व विमा अॅड-ऑन करून घेता येऊ शकतो. एखादी महिला गर्भवती असतानाही मातृत्व विमा काढू शकते. पण शक्यतो असा विमा अगोदर काढल्याने ऐनवेळी येणाऱ्या अडचणी टाळता येऊ शकतात.
प्रसूतीदरम्यान अनेक अनपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी साधारण आरोग्य विम्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर नसतात. त्यामुळे गरोदरपणात आरोग्य विम्यामध्ये मातृत्व विमा अॅड-ऑन करून घेणं फायदेशीर ठरू शकतं.