Maruti Suzuki Q4 Result: भारतीय कार मार्केटमध्ये मारुती सुझुकी आघाडीवर असून देशात सर्वाधिक गाड्यांची विक्री होते. आज (बुधवार) मारुती सुझुकीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जानेवारी-मार्च कालावधीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 42% जास्त नफा कमावला. 2 हजार 670 कोटी रुपये नफा नोंदवला. तसेच 5 लाख 14 हजार 927 गाड्यांची विक्री करून भारतीय वाहन क्षेत्रात नंबर एक असल्याचे सिद्ध केले. कोरोनानंतर पुरवठा साखळी सुरळीत होत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
बाजार विश्लेषक संस्था आणि माध्यमांच्या अंदाजानुसार कंपनीचा नफा अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 32 हजार 59 रुपये इतका राहीला. मागील वर्षातील याच तिमाहीशी तुलना करता महसूलातील वाढ 19% जास्त नोंदवली. गतवर्षी महसूल 26 हजार 740 इतका होता.
भागधारकांना लाभांशही जाहीर
चौथ्या तिमाहीत चांगला नफा झाल्याने कंपनीने भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर कंपनीने प्रति शेअर 90 रुपये लाभांश जाहीर केला. 2021-22 आर्थिक वर्षात कंपनीने 60 रुपये प्रतिशेअर लाभांश जाहीर केला होता. तिमाही निकाल जाहीर होताच भांडवली बाजारात मारुती सुझुकीचे भाव वधारले होते. बाजार बंद होताना मारुती सुझुकीच्या शेअरची किंमत 8,485 इतकी होती. दुपारी शेअर्सने 8549 पर्यंत मजल मारली होती. मात्र, नंतर पुन्हा शेअर खाली आला.
मारुती सुझुकीच्या गाड्यांची जानेवारी-मार्चमध्ये विक्री वाढली. गाड्यांची निर्यातही वाढली. निर्मिती खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करण्यात कंपनीला यश आले. तसेच कंपनीला संपूर्ण क्षमतेने विना अडथळा काम करता आले. परकीय चलनातील बदलही कंपनीला फायद्याचा ठरला. या सर्व कारणांमुळे कंपनी चांगला नफा कमावू शकली.
दरवर्षी 10 लाख कारची निर्मिती वाढणार
मारुती सुझुकीचे हरियाणातील मानेसर आणि गुरुग्राम येथे दोन मोठे निर्मिती प्रकल्प आहेत. तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पलेक्स आहे. देशांतर्गत विक्री आणि निर्यात होणाऱ्या गाड्यांची निर्मिती या प्रकल्पांमधून होते. दरवर्षी आणखी 10 लाख गाड्या निर्मितीसाठी क्षमता विकास करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. सध्या मानेसर आणि गुरुग्राम येथील प्रकल्पातून 13 लाख गाड्या प्रतिवर्षी तयार होतात. देशांतर्गत आणि निर्यातीची गरज लक्षात घेऊन संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. भारतातील निर्मिती प्रकल्पात तयार झालेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या 100 पेक्षा जास्त देशात निर्यात होतात.