Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam: सहारा हाऊसिंग बॉण्ड घोटाळा

Sahara Housing Bond Scam

Image Source : www.india.com

Market Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

भारतामध्ये आजपर्यंत कितीतरी कॉर्पोरेट स्कॅम झालेत. या स्कॅममधील प्रत्येक गुन्हा शोधण्यात व तो सिद्ध करण्यासाठी कालावधी देखील अपुरा पडतो. या मोठमोठ्या कंपन्यांना राजकीय अभय मिळत असल्याने त्यांच्या चौकशीमध्ये शिथिलता येते. पण असे असतानाही काही सरकारी विभाग व मोजके अधिकारी राजकीय दबाव झुगारून चौकशी सुरू ठेवून खऱ्या गुन्हेगाराविरोधात पुरावे सादर करून त्याला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI). 2014 मध्ये सेबीने भारतातील एका मोठ्या कंपनी विरोधात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या केसवर विजय मिळवून या केसमधील कंपनीच्या मालकाला खडी फोडायला पाठवले. 2014 मध्ये सेबीने सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने केलेल्या स्कॅम विरोधात उभी केली होती. तिचा त्यावेळी मोठा गाजावाज झाला होता. या केसमुळे अनेक गुंतवणूकदारांना न्याय मिळाला. आज आपण सहारा कंपनीने केलेल्या 24 हजार कोटी रुपयांच्या स्कॅमबद्दल (Market Scam) जाणून घेणार आहोत.

सहारा नक्की आहे काय? What is Sahara?

सहारा इंडिया परिवार हा एक लखनऊमधील उद्योग समूह आहे. ज्याचे मालक सुब्रत रॉय (Subrata Roy) हे आहेत. या कंपनीचा मुख्य व्यवसाय लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करणे आणि ते इतर ठिकाणी गुंतवून त्यांना चांगले रिटर्न देणे हा होता. जशी जशी ही कंपनी मोठी होऊ लागली, तसे कंपनीच्या अनेक नवीन कंपन्या तयार झाल्या. सहारा ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष हे सुब्रत रॉय होते. सहारा ग्रुपमध्ये अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नव्या कंपन्या जरी असल्या तरी सुब्रत रॉय यांची पहिली पसंती ही कायम फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रालाच राहिली होती. सहारा कंपनीची अजून एक खासियत म्हणजे या कंपनीचे नाव तुम्ही भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर अनेक वर्ष पहिले असेल. या ग्रुप ऑफ कंपनीच्या जवळजवळ 5 हजार आस्थापना होत्या. ज्यात सुमारे 14 लाख कर्मचारी काम करत होते. या कंपनीने खूप कमी वेळात मोठे यश मिळवले होते. त्यामुळे अनेकांची या कंपनीवर नजर होती. पण 2009-10 मध्ये असे काही झाले की, त्याने सर्वांचीच झोप उडाली.

काय आहे सहारा स्कॅम? What is Sahara Scam?

सहारा स्कॅमची सर्वात पहिली माहिती दिली ती सहारामधील चार्टेड आकाउंटंट रोशन लाल यांनी. रोशन लाल यांनी राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेला पत्र पाठवून सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन (SIREC) आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (SHIC) या दोन कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. रोशन लाल यांची मागणी राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने सेबीकडे सोपवली. सेबीने या दोन कंपन्यांच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची (Draft Red herring Prospectus) तपासणी केली. 

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय? What is Draft Red herring Prospectus? 

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे असा दस्तऐवज, जो कंपनीद्वारे सेबीला IPO फाईल करण्याआधी जमा केला जातो. ज्यामध्ये कंपनीची सगळी माहिती दिलेली असते. ज्याची तपासणी केल्यानंतरच सेबी IPO साठी कंपनीला ग्रीन सिग्नल देते. 

याच काळात सेबीला सहारा कंपनीबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. ज्यामध्ये सहारा ग्रुप आणि त्यांच्या त्या दोन कंपन्यांचा उल्लेख असायचा. यासर्व तक्रारींमुळे सेबीने या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे ठरवले.

चौकशी दरम्यान सहारा ग्रुपच्या सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन (SIREC) आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (SHIC) या दोन्ही कपन्यांनी अनुक्रमे 4 हजार कोटी आणि 32,300 कोटी रुपये गोळा केले होते. ज्याची कोठेच नोंद नव्हती. कंपनीच्या प्रॉस्पेक्टसनुसार हा पैसा Optionally Fully Convertible Debentures द्वारे लोकांकडून येत होता. याचे स्पष्टीकरण कंपनीला देता आले नाही आणि सेबीचा संशय खरा ठरला.


सहाराने कंपनीने 25 एप्रिल 2008 ते 13 एप्रिल 2011 या काळात सुमारे 3 कोटी लोकांकडून अंदाजे 18,000 कोटी रुपये गोळा केले होते. यामुळे कंपनीची लायब्लिटी 20 हजार कोटीपेक्षा जास्तीवर गेली. या सर्व प्रकारामुळे कंपनीच्या घोटाळ्याबद्दल लोकांना हळुहळू कळू लागले. त्यानुसार कंपनीवर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) आरोप ठेवण्यात आला होता.

या संपूर्ण घोटाळ्यात सेबीने एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. ती म्हणजे सेबीने आलेल्या तक्रारीवर वेळी कारवाई करून चौकशी सुरू केली होती. सहारा कंपनी ही एक मोठी व नावाजलेली कंपनी होती. कॉर्पोरेट जग आणि इन्व्हेस्टमेंटचे जग हे दोन्ही वेगवेगळे असले तरी ते एकत्र येऊन काम करतात. अशी दोन क्षेत्रे जेव्हा एकत्र येतात तेव्हा नियमांची गुंतागुंत वाढते. परिणामी अनेकवेळा कायद्याचे उल्लंघन होते. सहारा घोटाळ्यात सुद्धा असेच झाले. त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आणण्यास इतकी वर्षे गेली. 

गुंतवणूकदार म्हणून अशा गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. कारण फक्त भरपूर परतावा मिळतो म्हणून त्यात गुंतवणूक करणे, धोक्याचे ठरू शकते. म्हणून कोणतीही गुंतवणूक करताना त्या क्षेत्राची माहिती माहिती घेणे गरजेचे आहे. तुम्हाला त्याबाबत अधिक माहिती नसेल तर अधिकृत आर्थिक सल्लागारांकडून या गोष्टी समजून घ्या आणि अशाप्रकारच्या घोटाळ्यांपासून तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.