Market Opening Bell: भांडवली बाजार सुरू होताच आज(गुरुवार) प्रमुख निर्देशांकात किंचित वाढ पाहायला मिळाली. सध्या कॉर्पोरेट कंपन्या तिमाही निकाल जाहीर करत आहे. त्यामुळे बाजार दोलनामय स्थितीत आहे. बड्या कंपन्यांकडून मजबूत नफ्याची नोंद होताच बाजार काही काळ वधारताना दिसत आहे. बजाज फायनान्स, मारुती सुझुकी या कंपन्यांनी चांगल्या नफ्याची नोंद केल्याने बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 55 अंकांनी वधारून 60356 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17831 अंकांवर ट्रेड करत आहे.
टॉप गेनर्स आणि लूझर्स
निफ्टी निर्देशांकातील बजाज फायनान्स, कोटक बँक, रेमंड, एसबीआय लाइफ, युपीएल, बजाज फेनसर्व्ह या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर एचडीएफसी लाइफ, ग्रासिम, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओनजीसी आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स खाली आले. सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 5 अंकांनी वाढून 81.69 झाला आहे. बँक निफ्टी वधारत असून 43000 अंकांपर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
तिमाही निकालानंतर बजाज फायनान्स, मारुती सुझुकीच्या शेअर्सची स्थिती
काल(बुधवार) मारुती सुझुकीने तिमाही निकाल जाहीर केले. मागील वर्षाच्या तुलनेत 42% जास्त नफा कमावला तरी बाजार सुरू होताच शेअर्स किंचित खाली आला. बजाज फायनान्सने चौथ्या तिमाहीत 3,158 कोटी रुपये नफ्याची नोंद केल्यामुळे कंपनीचे शेअर्स आज 2% वधारले. बजाज फायनान्सचा शेअर्स आज सकाळी 6,170 च्या सुमारास ट्रेड करत होता. कंपनीने 30 रुपये प्रतिशेअर्स लाभांशही जाहीर केला. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीचा नफा 30% जास्त आहे.
आज अमेरिकन भांडवली बाजार खाली आल्याने त्याचा परिणाम भारतातही दिसून आला. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती पुन्हा वर गेल्या आहेत. मंदीच्या शक्यतेमुळे तेलाचे भाव खाली आले होते. मात्र, आता पुन्हा इंधनाचे प्रति बॅरल दर वाढले आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, विप्रो, LTIMindtree, टेक महिंद्रा आणि Laurus Labs या कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.