Share Market Live: सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज (सोमवार) शेअर बाजार सुरू झाला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 35 अंकाची वाढ होऊन 17634 वर आला आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 26 अंकांनी वाढून 59858 वर रेंगाळत आहे. गुंतवणूकदार नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीच्या निकालांची वाट पाहत आहेत. सोबतच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची आणि भारतातील महागाईची आकडेवारीही लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे गुंतवणुकदार सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. त्यामुळे शेअर बाजाराची सुरुवातही मोठ्या तेजीने झाली नाही.
चर्चेतील शेअर्स कोणते?
निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत, ही आश्वासक बाब आहे. शेअर बाजार सुरू होताच टाटा मोटर्स, अदानी एंटरप्राइजेस, टायटन, अदानी पोर्ट्स, ओएनजीसीचे शेअर्स वरती गेले. तर एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, ब्रिटानिया, इंडसंड बँक आणि एसबीआय लाइफचे शेअर्स आपटले. मागील आठवड्यात गुरुवारी शेअर बाजार रेंगाळला होता. त्यानंतर आज किंचित वाढ झाली. आता चौथ्या तिमाहीतील निकालानंतर बाजार किती उसळी घेतो हे या आठवड्यात समजेल.
परदेशी गुंतवणूक वाढली
भांडवली बाजारात मागील सहा सत्रात परदेशी गुंतवणुकदारांनी (FII) 4740 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवले आहेत. या काळात निफ्टी साडेसहाशे अंकांनी वधारला. 12 तारखेपासून चौथ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर होण्यास सुरुवात होईल. देशातल्या आघाडीच्या उद्योगांची नफ्याची आकडेवारी चांगली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व घडामोडींतून भारतीय बाजार सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार
तिमाहीतील भाववाढीच्या आकडेवारीवर सुद्धा गुंतवणुकदारांची नजर असणार आहे. बुधवारी TCS, इन्फोसिस आणि एचडीएफसी चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर करणार आहे. तसेच अमेरिकेतील चौथ्या तिमाहीची आकडेवारीही याच आठवड्यात जाहीर होणार आहे. अमेरिकेतील फेडरल बँक महागाई इतर अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा डेटा जाहीर करेल. या घडामोडींच्या पाश्वभूमीवर जगभरातील भांडवली बाजारात मोठ्या हालचाली पाहायला मिळतील.
रुपया 24 पैशांनी वधारला
डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी वधारून 81.78 झाला. परदेशी गुंतवणुकदारांची भारतात वाढलेली गुंतवणूक आणि स्थानिक बाजारातील स्थिती यास कारणीभूत ठरली. गुरुवारी रुपया 82.02 वर होता. त्यात आज सुधारणा झाली. गुरुवारी (7 एप्रिल) गुड फ्रायडे सणानिमित्त शेअर मार्केट बंद होते.