भारतीय भांडवली बाजार मागील सहा दिवसांपासून तेजीत आहे. कॉर्पोरेट कंपन्या उद्यापासून तिमाहीचे निकाल जाहीर करतील, त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्समध्ये 342 अंकांची वाढ होऊन 60189 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 98 अकांनी वाढला. बाजार बंद होताना निफ्टी 17,722 अंकांवर स्थिरावला.
ऑटो, मेटल आणि बँक तेजीत
मेटल, ऑटो आणि बँक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स आज दिवसभरात वधारले. मात्र, आयटी कंपन्यांचे भाव गडगडले. उद्या (बुधवार) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. मात्र, निकालाआधीच आयटी कंपन्यांचा निफ्टी खाली आला. L&T, HCL, इन्फोसिस, टीसीएस कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आले. दरम्यान, टीसीएस कंपनी तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत दुप्पट नफा नोंदवेल, असे बोलले जात आहे. मात्र, हा अंदाज असून उद्या चित्र स्पष्ट होईल.
कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा व्यापार तेजीत आहे. मात्र, डॉलर कमकूवत झाला आहे. अमेरिकेची फेडरल बँक महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर करणार आहे. त्याची वाट गुंतवणुकदार पाहत आहेत. मागील शुक्रवारी रोजगार संबंधित आकडेवारी सकारात्मक असल्याने बाजार पूर्णत: आपटला नाही. तसेच फेडरल बँक व्याजदर वाढीबाबत काय निर्णय घेते, हे एप्रिल महिन्यात कळेल.
रिझर्व्ह बँक भाववाढीची तिमाही आकडेवारीही लवकरच जाहीर करणार आहे. आरबीआयने सध्या व्याजदर वाढीला ब्रेक लावला असला तरी महागाई नियंत्रणात नाही. याचा परिणाम गुंतवणुकदारांच्या निर्णयावर होऊ शकतो. जर महागाई नियंत्रणात राहीली नाही तर पुढील तिमाहीत पुन्हा दरवाढ होऊ शकते. मागणी आणि पुरवठ्याचा समतोल साधण्याचे आव्हान रिझर्व्ह बँकेपुढे आहे.