Market Closing Bell: भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात सकाळपासूनच नकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक बाजार बंद होईपर्यंत लाल रंगात ट्रेड करत होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 520 अंकांनी खाली आला. सेन्सेक्स 59,910.75 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 121 अंकांनी कोसळून 17,706.85 अंकावर बंद झाला. आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले तर सार्वजनिक बँकांचे भाव वधारले.
आज (सोमवारी) भारतीय भांडवली बाजार खाली आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स ढासळले. इन्फोसिस कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. त्यामुळे बाजार बंद होईपर्यंत इन्फोसिसचा शेअर्स 15 टक्क्यांनी खाली आला. आज इन्फोसिसचा शेअर्स 1,259.00 अंकांवर ट्रेड करत होता. सोबतच परसिस्टंट, टेक महिंद्रा, झेन्सार, एचसीएल, विप्रो, इन्फो एज, एम्फसीस कंपनीचे शेअर्स खाली आले आहे. आयटी निफ्टीला मोठा फटका बसला.
13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 8 निर्देशांक आज कोसळले. आयटी इंडेक्स साडेसहा अंकांनी कोसळला. मार्च 2020 पासून आयटी क्षेत्राचे भाव आज सर्वाधिक खाली आले. एचसीएल कंपनीचे तिमाही निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. मात्र, निकालापूर्वीच कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी खाली आले आहेत.
टॉप गेनर्स कंपन्या कोणत्या?
KIOCL Ltd कंपनीचा शेअर्स 14 टक्क्यांनी वधारला. तर इंडियन बँकेचा शेअर्स 7 टक्क्यांनी वाढून 309 वर पोहचला. सीएसबी बँकेचा शेअर्स 6.15% वाढून 285 वर आला. रेमंड कंपनीचा शेअर्सही सुमारे 6 टक्क्यांनी वधारला. मागील 9 दिवसांपासून शेअर बाजारात जी घोडदौड सुरू होती तिला आज लगाम लागला.
जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असतानाही युरोपीयन आणि अमेरिकेतील भांडवली बाजाराने चांगली कामगिरी केली. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेतील भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळाली. केंद्रीय बँकांकडून दरवाढीची शक्यता अद्यापही घोंगावत आहे. मात्र, भारतीय बाजारात तिमाही निकालाच्या पाश्वभूमीवर आज दिवसभर मंदी पाहायला मिळाली.